बंगळुरू : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काँग्रेस म्हणजे खोटी गॅरंटी या विधानावर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी जोरदार पलटवार केला आहे. ते कर्नाटकातील कलबुर्गी येथील एका प्रचारसभेत बोलताना म्हणाले पंतप्रधान मोदी एखाद्या विषारी सापासारखे आहेत. हे विष आहे की नाही असा प्रश्न तुम्हाला पडेल. त्यात तुम्ही हे विष चाखले, तर तुमचा मृत्यू निश्चित आहे हे लक्षात घ्या.
त्यानंतर रोनमध्ये झालेल्या सभेत खरगे म्हणाले भ्रष्ट भाजप सरकार कर्नाटकची लूट करत आहे. येथे प्रत्येक कामासाठी ४०% कमीशन वसूल केले जाते. घोटाळ्यांचा आरोप असणा-यांना देशातून पळून जाण्यात मदत केली जाते. मोदी स्वत: भ्रष्टाचा-यांना वाचवण्याचा प्रयत्न करीत आहेत. तत्पूर्वी, गुरुवारी सकाळी पंतप्रधानांनी कर्नाटकातील ५० लाख भाजप कार्यकर्त्यांना व्हर्च्युअली संबोधित केले. त्यात त्यांनी काँग्रेसवर निवडणूक आश्वासनांची पूर्तता न केल्याचा आरोप केला.
काँग्रेस म्हणजे खोटी गॅरंटी, काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची हमी, अशी टीका त्यांनी यावेळी केली. त्यांच्या या टिकेला प्रत्युत्तर देताना काँग्रेस नेते जयराम रमेश म्हणाले की, १० मे रोजी कर्नाटकातील जनता भाजपचे ४०% कमिशनचे सरकार हद्दपार करण्याची गॅरंटी देईल. काँग्रेस राजस्थान, छत्तीसगड व हिमाचल प्रदेशासारखीच कर्नाटकातही गॅरंटी लागू करेल.
पंतप्रधान नैराश्यात
काँग्रेस नेते जयराम रमेश म्हणाले की, पंतप्रधानांनी नैराश्यातून ही टीका केली आहे. जयराम ट्विटरवर म्हणाले की, गृहमंत्री अमित शहा व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी यांच्यानंतर आता पंतप्रधान मोदी निराशेतून अपमानास्पद विधाने करत आहेत. पंतप्रधानांच्या विधानानंतर काही तासांतच जयराम यांची ही प्रतिक्रिया आली आहे.
काँग्रेसने आश्वासने १०० टक्के पूर्ण केलीत
काँग्रेसने राजस्थानात जुनी पेन्शन योजना, १२५ दिवस काम, आरोग्याचा अधिकार व चिरंजीवी योजना लागू केली. आमच्या पक्षाने छत्तीसगडमध्ये शेतक-यांना कर्जमाफी, राजीव गांधी किसान न्याय योजना व जुनी पेन्शन योजना लागू केली. काँग्रेसने आपली जवळपास १००% आश्वासने पूर्ण केली आहेत.