टोकियो : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्यात जपानमधील क्वाड बैठकीदरम्यान द्विपक्षीय चर्चा पार पडली. यावेळी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी कोविड महामारीचा सामना लोकशाही पद्धतीने यशस्वीपणे हाताळल्याबद्दल पंतप्रधान मोदींचे कौतुक केले. आपल्या कार्यकाळात अमेरिकेचे भारतासोबतचे संबंध अधिक घट्ट आणि घनिष्ठ व्हावेत अशी आपली इच्छा असल्याचेही बायडन म्हणाले.
पंतप्रधान मोदींच्या यशाने जगाला दाखवून दिले आहे की, लोकशाही असलेले देश चीन आणि रशियासारख्या निरंकुश देश वेगाने बदलणारे जग अधिक चांगल्या प्रकारे हाताळू शकते. कारण त्यांचे नेतृत्व दीर्घ लोकशाही प्रक्रियेतून न जाता निर्णय घेऊ शकतात आणि अंमलबजावणी करू शकतात. यावेळी पंतप्रधान मोदींनी बायडन यांना तुम्हाला भेटून आनंद झाल्याचे सांगितले.
तसेच भारत आणि अमेरिका यांच्यात विश्वासाचे नाते असून, व्यापाराव्यतिरिक्त दोन्ही देशांमधील संबंध प्रगतिपथावर असल्याचे म्हटले आहे. इंडो-पॅसिफिकमध्ये समविचारी देशांना सोबत घेऊन जाऊ, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले. जागतिक शांततेसाठी भारत-अमेरिका मैत्री महत्त्वाची आहे. आमचा समान हितावरील विश्वास दृढ झाला असून, आमची मैत्री मानव कल्याणासाठी वचनबद्ध असल्याचे मोदी म्हणाले.
यूएस डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशनसाठी भारतात काम सुरू ठेवण्यासाठी, लस उत्पादन, स्वच्छ ऊर्जा उपक्रमांना पाठिंबा देण्यासाठी करार केला आहे याचा मला आनंद होत असल्याचे बायडन म्हणाले. आपल्या कार्यकाळात अमेरिकेचे भारतासोबतचे संबंध अधिक घट्ट आणि घनिष्ठ व्हावेत अशी आपली इच्छा आहे.
यावेळी बायडन यांनी रशियाने युके्रनवर केलेल्या आक्रमणाचा मुद्दाही उपस्थित करत पुतिन यांची भूमिका हा एक किंवा अनेक देशांचा मुद्दा नाही, तर ते संपूर्ण जगाचे संकट आहे असे म्हटले.
भारत आणि अमेरिकेची भागीदारी ही ख-या अर्थाने विश्वासाची भागीदारी आहे. आमच्या सामायिक हितसंबंध आणि मूल्यांमुळे दोन्ही देशांमधील विश्वासाचे बंध अधिक दृढ झाले आहेत, असे मत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी व्यक्त केले.