नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घराचे नाव लोककल्याण ठेवण्यात आहे. परंतु लोककल्याण नाव ठेवल्याने लोकांचे कल्याण होत नाही, अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विटरवरून केली. केंद्र सरकारने २०२१-२२ या आर्थिक वर्षात कर्मचारी भविष्यनिर्वाह निधीवर व्याज दर कमी करण्याच्या निर्णयाला मंजुरी दिल्यानंतर राहुल गांधी यांनी ट्विट केले. पंतप्रधानांनी साडेसहा कोटी कर्मचा-यांचे वर्तमान तसेच त्यांचे भविष्य उध्वस्त करण्यासाठी ‘महागाई वाढवा, कमाई घटवा’ हे मॉडेल लागू केले आहे, असे राहुल गांधी म्हणाले.
कर्मचारी भविष्यनिर्वाह निधीचे दर ४० वर्षात सर्वात नीचांकी असल्याच्या आशयाची एक बातमी राहुल गांधी यांनी ट्विटरवरून पोस्ट केली आहे. केंद्र सरकारने कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संघटनेच्या जवळपास पाच कोटी खातेधारकांना २०२१-२२ मध्ये भविष्य निर्वाह निधीवर ८.१ टक्के व्याज देण्यास मंजूरी दिली आहे. चार दशकांमध्ये ईपीएफवर एवढे कमी व्याज मिळत आहे. १९७७-७८ मध्ये ईपीएफ वर ८ टक्के व्याज देण्यात आले होते. त्यानंतर नेहमी ८.२५ टक्के अथवा त्याहून अधिक व्याज देण्यात आले. कमी व्याजदराच्या मुद्यावरून केंद्र सरकारला घेरण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून केला जात आहे.