चंदीगड (वृत्तसंस्था) : नवीन कृषी कायद्यांच्या विरोधात सुप्रीम कोर्टात दाद मागणार असल्याचे सूतोवाच पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी केले आहे. भाजपप्रणीत केंद्र सरकारवर टीका करताना त्यांनी सांगितले की, कृषी कायद्यांमुळे राज्यांचे अधिकार हिरावले गेले आहेत.
अमरिंदर सिंग व अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सरचिटणीस हरीश रावत, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड यांच्यासह काही नेत्यांनी शहीद भगतसिंग यांना त्यांच्या ११३ व्या जन्मदिनी खातकर कलान खेड्यात श्रद्धांजली वाहिली.
अमरिंदर, रावत व इतरांनी नवीन कृषी कायद्याच्या विरोधात धरणे आंदोलन केले. या वेळी उपस्थितांसमोर अमरिंदर सिंग यांनी सांगितले की, केंद्राने केलेल्या कृषी कायद्यांमुळे शेतकरी उद्ध्वस्त होणार आहे. आम्ही हे प्रकरण लावून धरणार आहोत. राष्ट्रपतींनी विधेयके संमत केली आहेत. त्यामुळे आता सर्वोच्च न्यायालयात दाद मागावी लागणार आहे. राज्य सरकार शेतक-यांच्या संरक्षणासाठी सर्वतोपरी पावले उचलील. दोन वकील उद्याच दिल्लीहून येत असून त्यांच्याशी आपण या कायद्यांना आव्हान देण्याबाबत चर्चा करणार आहोत.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी रविवारी तीन वादग्रस्त कृषी विधेयकांना मान्यता दिली असून त्या विरोधात पंजाबमध्ये आंदोलने सुरू आहेत. शेतक-यांना निदर्शने करण्याचा अधिकार आहे. त्यांना रोजीरोटीसाठी तसे करण्याचा अधिकार आहे, असे अमरिंदर यांनी सांगितले. तुम्ही आता कृषी क्षेत्रात राज्यांचे अधिकार काढून घेतले त्यामुळे राज्यांना काय राहिले. मग आम्ही राज्ये कशी चालवायची असा सवाल त्यांनी केला.