वायनाड : काँग्रेस नेते आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी आपल्या मतदारसंघाच्या दौ-यावर आहेत. यावेळी त्यांनी सर्वस्व गमावलेल्या दोन बहिणींना घराच्या चाव्या सुपूर्त केल्या. या बहिणींची आई व भाऊ गतवर्षी झालेल्या दुर्घटनेत मरण पावले होते. तेव्हा त्यांचे सांत्वन करताना राहुल गांधी यांनी त्यांना नवीन घर देण्याचे आश्वासन दिले होते. हे आश्वासन राहुल गांधींनी पाळले असून, दोघींकडे नवीन घराच्या चाव्या सूपूर्द केल्या आहेत.
८ ऑगस्ट २०१९ मधील कवलप्परा दुर्घटनेत काव्या व कार्तिका या बहिणींनी आपली आई तसंच ३ भावांना गमावले होते. राहुल गांधी यांनी दुर्घटनेनंतर दौरा करताना त्यांना नवीन घर देण्याचे आश्वासन दिले होते. जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी झालेल्या कार्यक्रमात राहुल गांधी यांनी दोन्ही बहिणींना घराच्या चाव्या प्रदान केल्या. राहुल गांधी यांनी केलेल्या मदतीमुळे मुलींना दिलासा मिळाला आहे. दुर्घटनेनंतर जेव्हा ते आम्हाला भेटले तेव्हा त्यांनी आम्हाला घराची ऑफर दिली होती. गेल्या भेटीवेळी त्यांनी आमच्यासाठी मिळवलेल्या जमिनीची कागदपत्रे दिली आणि यावेळी त्यांनी घराच्या चाव्या दिल्या आहेत. पुन्हा एकदा सामान्य आयुष्य जगण्यासाठी मिळत असल्याने आम्ही आनंदी आहोत, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.
त्या वक्त्यव्याचे समर्थन नाही
मध्य प्रदेशमध्ये सध्या माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी इमरती देवी यांना आयटम असे संबोधल्यावरून मोठा राजकीय वाद सुरू आहे. कमलनाथ हे माझ्या पक्षाचे आहेत, परंतु वैयक्तिकदृष्ट्या मला त्यांनी वापरलेली भाषा अजिबात आवडलेली नाही. मी त्याचे समर्थन करत नाही, मग ते कोणीही असो. हे दुर्देवी आहे. असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मौन सोडले आहे.