पाटणा : लँड फॉर जॉब घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने(ईडी) शुक्रवारी दिल्ली, नोएडा आणि पाटणा येथील १५ ठिकाणी छापे टाकले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ईडीच्या टीमने लालू यादव यांच्या मुलींच्या दिल्लीतील घरांवरही छापे टाकले. यासोबतच ईडीचे पथक राजदचे माजी आमदार के अबू दोजाना यांच्या पाटणा येथील घरीही पोहोचले असून छापेमारी सुरू आहे. माजी आमदार अबू दोजाना हे बांधकाम व्यावसायिक असून लालूंच्या जवळचे आहेत.
जमिनीच्या बदल्यात नोकरीच्या प्रकरणात लालू यादव यांच्या अडचणी वाढत आहेत. दोनच दिवसांपूर्वी सीबीआयच्या पथकाने लालू यादव यांची दिल्लीत चौकशी केली. दुसरीकडे, ईडीने शुक्रवारी दोन राज्यांमध्ये छापे टाकले आहेत. लालू यादव यांच्या तीन मुलींच्या घरांवरही छापे टाकण्यात आल्याची माहिती आहे. हेमा, रागिणी आणि चंदा यांचे घर दिल्लीत असून सध्या घरी ईडीची टीम हजर आहे. सूत्रांवर विश्वास ठेवला तर ईडीचे पथक बिहारचे उपमुख्यमंत्री लालू यादव यांचे पुत्र तेजस्वी यादव यांच्या दिल्लीतील निवासस्थानीही पोहोचले आहे.
बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी लालूंचे निकटवर्तीय आणि आरजेडी नेते अबू दुजाना यांच्या पाटणा येथील घरावर ईडीने शुक्रवारी छापा टाकला. ईडीचे पथक पहाटेच त्याच्या घरी पोहोचले. आजूबाजूच्या लोकांनी सांगितले की, सकाळी ६ वाजता ईडीचे अधिकारी छापा टाकण्यासाठी माजी आमदार अबू दुजाना यांच्या घरी पोहोचले. यावेळी अधिका-यांनी सर्व लोकांना घरात राहण्याच्या सूचना दिल्या.
अधिका-यांची टाळाटाळ
याबाबत अधिकारी काहीही बोलण्यास टाळाटाळ करताना दिसत होते. अबू दुजाना हे आरजेडीचे माजी आमदार आहेत आणि त्यांनी सुरसंदमधून निवडणूक जिंकली आणि आरजेडीचा झेंडा फडकवला. गेल्या निवडणुकीत त्यांनी आरजेडीकडून सुरसंदमधून निवडणूक लढवली आणि पराभूत झाले. छाप्यादरम्यान अबू दुजाना घराच्या बाल्कनीत आले. ही कारवाई म्हणजे राजकीय षडयंत्र असल्याचे त्यांनी सांगितले.