प्रमोद तिवारी यांच्याकडे कॉंग्रेसचे उपनेतेपद
नवी दिल्ली : राज्यसभेत काँग्रेसने प्रतोद म्हणून खासदार रजनीताई पाटील यांची नियुक्ती केली आहे, तर उत्तर प्रदेशातील आपले ज्येष्ठ नेते प्रमोद तिवारी यांची राज्यसभेतील उपनेतेपदी निवड करण्यात आली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी ट्वीट करून याबाबतची माहिती दिली. अर्थसंकल्पीय अधिवेशनात निलंबनाची कारवाई झालेल्या रजनीताई पाटील यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवित काँग्रेसने प्रतोद म्हणून नियुक्ती केली आहे.
राज्यसभेतील काँग्रेसचे उपनेते म्हणून प्रमोद तिवारी यांची निवड करण्यात आली. याआधी हे पद आनंद शर्मा यांच्याकडे होते, तर राज्यसभा गटनेतेपदी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हेच तूर्तास कायम आहेत. काँग्रेसमध्ये अध्यक्षपद मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे आल्यानंतर राज्यसभेतील गटनेता बदलला जाईल, अशी चर्चा होती. पण तूर्तास तो बदल करण्यात आला नाही.
काँग्रेस संसदीय पक्षाच्या प्रमुख सोनिया गांधी यांनी प्रमोद तिवारी यांची राज्यसभेतील पक्षाचे उपनेतेपदी आणि रजनी पाटील यांची प्रतोद म्हणून नियुक्तीला मान्यता दिली आहे. राज्यसभेचे अध्यक्ष यांना या नियुक्त्यांची माहिती देण्यात आली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे पक्षाचे नेते म्हणजेच राज्यसभेतील विरोधी पक्षनेते आहेत.
आनंद शर्मा यांचा राज्यसभेचा कार्यकाळ गेल्या वर्षी संपल्याने पक्षाकडे उपनेते नव्हते. त्यामुळे आता उत्तर प्रदेशचे प्रमोद तिवारी यांची उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली. ते राजस्थानचे राज्यसभा सदस्य आहेत. महाराष्ट्राच्या रजनीताई पाटील या त्यांच्याच राज्यातून राज्यसभेच्या सदस्य आहेत. १३ मार्चपासून सुरू होणा-या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुस-या टप्प्याच्या दोन दिवस आधी काँग्रेसने या नियुक्त्या केल्या आहेत.