23.1 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeराष्ट्रीयराज्यसभा निवडणूक : चार राज्यातील १६ जागांसाठी काट्याची टक्कर

राज्यसभा निवडणूक : चार राज्यातील १६ जागांसाठी काट्याची टक्कर

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वी राज्यसभा निवडणुकीबाबत देशभरात उत्सुकता लागली आहे. मतदान आणि निकाल लागायला अजून काही तास उरले आहेत. विशेष म्हणजे, राज्यसभा निवडणुकीअंतर्गत १५ राज्यांत एकूण ५७ जागांसाठी निवडणुका झाल्या होत्या, मात्र उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत ४१ सदस्य बिनविरोध निवडून आले. अशा स्थितीत आता केवळ १६ जागांवर निवडणूक होणार आहे.

या सर्व १६ जागांसाठी चार राज्यांमध्ये १० जून रोजी मतदान होत आहे. तसेच, शुक्रवारी सायंकाळपर्यंत निकाल अपेक्षित आहेत. महाराष्ट्र, राजस्थान, हरियाणा आणि कर्नाटक या चार राज्यांमध्ये राज्यसभेच्या निवडणुका आहेत. अशा परिस्थितीत हॉर्स ट्रेडिंग आणि क्रॉस व्होटिंगच्या भीतीने सर्वच पक्ष आपापल्या आमदारांना एकत्र करण्याचा प्रयत्न करत आहेत. यात पक्षांतर्गत हेराफेरीचे राजकारणही सुरू आहे. या चार राज्यांतील राजकीय समिकरणांचा हा गोषवारा…

महाराष्ट्र- महाराष्ट्रात राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक होत आहे. यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे प्रत्येकी एक जागा जिंकण्याइतपत संख्याबळ आहे, तर भाजपकडे दोन जागांसाठी पुरेसे आमदार आहेत. राज्यसभेवर उमेदवार पाठवण्याइतपत संख्याबळ शिवसेनेकडेही आहे. मात्र, सहाव्या जागेसाठी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. भाजप आपला तिसरा आणि शिवसेना आपला दुसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे.

राजस्थान- राजस्थानमध्ये चार जागांसाठी मतदान होत आहे. यासाठी काँग्रेसकडून मुकुल वासनिक, रणदीप सुरजेवाला आणि प्रमोद तिवारी हे तीन उमेदवार रिंगणात आहेत. दुसरीकडे अपक्ष उमेदवार सुभाष चंद्रा हे रिंगणात असून, त्यांना भाजपचा पाठिंबा आहे. काँग्रेसकडे स्वत:चे १०८ आमदार आहेत. याशिवाय आरएलडीचे सुभाष गर्ग यांचाही पाठिंबा आहे. १३ अपक्ष, दोन सीपीएम आणि दोन बीटीपी आमदार काँग्रेसला पाठिंबा देण्याची अपेक्षा आहे. अशा स्थितीत काँग्रेसला १२६ आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. काँग्रेसला तिन्ही उमेदवारांसाठी १२६ आमदारांच्या मतांची गरज आहे.

हरियाणा- हरियाणात राज्यसभेच्या दोन जागांसाठी निवडणूक होत आहे. निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या कार्तिकेय शर्मा यांना भाजपचा पाठिंबा आहे. तसेच भाजपने कृष्णा पनवार यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसकडून अजय माकन रिंगणात आहेत. सत्ताधारी भाजप-जेजेपी युती आपल्या ४० आमदारांच्या बळावर एक जागा जिंकणार आहे. काँग्रेसचे विधानसभेत ३१ आमदार असून ही दुसरी जागा जिंकण्यासाठी पुरेशी मते आहेत.

कर्नाटक- कर्नाटकात राज्यसभेच्या चार जागांसाठी निवडणूक होत आहे. २२४ जागांच्या कर्नाटक विधानसभेत राज्यसभेची जागा जिंकण्यासाठी ४५ आमदार लागतात. विधानसभेत ७० आमदार असलेल्या काँग्रेसने जयराम रमेश आणि मन्सूर अली खान हे दोन उमेदवार उभे केले आहेत. दुस-या जागेसाठी काँग्रेसला आणखी २० मतांची गरज आहे. भाजपचे १२१ आमदार आहेत. पक्षाने निर्मला सीतारामन, कन्नड चित्रपट अभिनेते जगेश आणि लहर सिंग यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे भाजपलाही आणखी १४ मतांची गरज आहे. जेडीएसकडे ३२ आमदार आहेत. डी . कुपेंद्र रेड्डी यांनाही त्यांनी मैदानात उतरवले आहे. रेड्डी यांना आणखी १३ आमदारांच्या पाठिंब्याची गरज आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या