वांद्री : मध्य प्रदेशातील सागर येथील एका भाजप नेत्याच्या दवाखान्यात गर्भपात केल्यानंतर एका आदिवासी अल्पवयीन बलात्कारपीडितेची प्रकृती खालावली. त्यानंतर तिला वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. याची माहिती मिळताच पोलिसांनी भाजप नेत्याचा दवाखाना सील केला आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सागर जिल्ह्यातील बांद्री पोलिस स्टेशन परिसरात बलात्कार झालेली आदिवासी अल्पवयीन मुलगी ८ महिन्यांची गर्भवती होती. माहिती मिळताच आरोपीच्या आईने सागरच्या लजपतपुरा येथील भाजप नेत्या प्रमिला मौर्य यांच्या क्लिनिकमध्ये गर्भपात केला. गर्भपाताच्या दुस-या दिवशी तिची प्रकृती खालावल्याने तिला सागर बुंदेलखंड वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले,
तेथे उपचारादरम्यान १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाला. मृत मुलीचा पोस्टमार्टेम रिपोर्ट आल्यानंतर ही बाब समोर आली. ही बाब उघडकीस येताच खुरईचे एसडीओपी सुमित केरकेट्टा यांनी वांद्री पोलिसांच्या पथकासह सागर गाठले. पोलिसांनी क्लिनिक सील केले.
त्यानंतर बलात्काराचा आरोपी सोनू चदर, त्याची आई गुड्डीबाई यांच्याविरुद्ध पोक्सो कायद्याअंतर्गत कलम ३७६ आणि भाजप नेत्या प्रमिला मौर्य यांच्याविरुद्ध कलम ३१४ (गर्भपातानंतर मृत्यू) गुन्हा दाखल केला आहे. प्रमिला मौर्य या भाजप महिला मोर्चा हरिसिंग गौर मंडळाच्या अध्यक्षा आहेत.
खुरई एसडीओपी सुमित केरकेट्टा यांनी सांगितले की, बांद्रीमध्ये आरोपींवर आयपीसी कलम ३७६ आणि ३१४ अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. आतापर्यंतच्या तपासात अल्पवयीन मुलगी गर्भवती असताना तिचा गर्भपात किंवा वैद्यकीय उपचार केल्याचे आढळून आले आहे. येथे एक दवाखाना (डिस्पेन्सरी) सुरू होता, जो प्रमिला मौर्य चालवत होत्या. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू आहे.