नवी दिल्ली : युद्धाच्या प्रसंगात भारताला हवाई वर्चस्व मिळवून देणा-या अत्याधुनिक ‘राफेल’ फायटर विमानांचा आज इंडियन एअर फोर्सच्या ताफ्यात समारंभपूर्वक समावेश करण्यात आला. अंबाला एअर बेसवर झालेल्या शानदार सोहळयात ‘राफेल’ फायटर विमाने भारतीय वायू दलाचा भाग झाले. ४.५ जनरेशनचे हे फायटर विमान अनेक अंगांनी वैशिष्टयपूर्ण आहे. शत्रूला धडकी भरवणारी शस्त्रास्त्रे ही राफेलची खासियत आहे.
राफेलच्या पहिल्या तुकडीत पाच विमाने असून ही स्क्वॉड्रन म्हणून ओळखली जाईल. २९ जुलैला राफेल फायटर विमानांचे भारतात आगमन झाले होते. पूर्व लडाखमध्ये भारत व चीन यांच्यात सीमेवर प्रचंड तणावाची स्थिती असताना राफेल विमानांचा आज औपचारिकरित्या इंडियन एअर फोर्समध्ये समावेश झाला. अंबाला एअर बेसवर झालेल्या या कार्यक्रमाला भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, फ्रान्सच्या संरक्षण मंत्री फ्लॉरेन्स पार्ली, आयएएफप्रमुख आर. के. भदौरिया, सीडीएस बिपीन रावत, संरक्षण सचिव डॉ. अजय कुमार आणि फ्रान्सचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
राफेलचा समावेश करताना पारंपरिक सर्वधर्म पूजा करण्यात आली. त्यानंतर चित्तथरारक कवायती झाल्या आणि राफेल रितसर हवाई दलात दाखल झाले. २०१६ मध्ये भारताने फ्रान्सबरोबर ३६ राफेल फायटर विमाने खरेदीचा ६० हजार कोटींचा करार केला होता.त्यातील पहिली पाच विमाने भारताला मिळाली आहेत. पुढच्या दोन ते तीन वर्षात टप्याटप्याने उर्वरित राफेल विमाने भारताला मिळणार आहेत.
देशात रुग्णसंख्येचा आलेख चढताच