33.5 C
Latur
Saturday, June 3, 2023
Homeराष्ट्रीयभाजपमध्ये बंडखोरीला उधान

भाजपमध्ये बंडखोरीला उधान

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांच्या पहिल्या दोन याद्या जाहीर केल्यावर तिकीट कापलेल्या किमान १८ आमदारांनी एकामागोमाग एक बंडखोरीचा पवित्रा घेतला आहे. यात प्रभावशाली लिंगायत समाजातील आमदारांची बंडखोरी पक्षासाठी डोकेदुखी ठरू शकते, हे ओळखून केंद्रीय नेतृत्वाने आपत्ती निवारणाचे प्रयत्न गतिमान केले आहेत. त्यासाठी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यापेक्षा ज्येष्ठ नेते बी. एस. येदियुरप्पा यांच्यावरच अधिक भिस्त असल्याचे दिसत आहे.

केंद्रीय पक्षनेतृत्वाला संभाव्य बंडखोरीची कल्पना होती. मात्र भाजपच्या जुन्या नेत्यांची बंडखोरी इतक्या मोठ्या प्रमाणावर होईल याचा नेमका अंदाज दिल्लीला आला नसावा व त्यातूनच बंडखोरीची लाट भाजपमध्ये आली आहे असे भाजपमधील सूत्रांनी सांगितले. संतप्त झालेले मुदिगेरेचे आमदार एम. पी. कुमारस्वामी यांनी धर्मनिरपेक्ष जनता दलात जाण्याचे जाहीर करून भाजप व आमदारकीचा राजीनामा देण्याची घोषणा केली. कुमारस्वामी यांच्याऐवजी भाजपने मुदिगेरेतून दीपक दोड्डाय्या यांना उमेदवारी दिली आहे. येदियुरप्पा यांनी फक्त आठवडाभर फोन बंद केला तर भाजपला ४०- ५० जागाही जिंकता येणार नाहीत व कोणीही आले तरी त्यांच्याशिवाय लोक भाजपच्या सभांकडे फिरकणारही नाहीत असे कुमारस्वामी म्हणाले. राष्ट्रीय महासचिव सी. टी. रवी यांच्यामुळे आपल्याला तिकीट नाकारल्याचा त्यांचा आरोप आहे.

अपक्ष रिंगणात उतरून भाजपला हरवू
उरलेल्या यादीत नाव नसले तर अपक्ष म्हणून ंिरगणात उतरून भाजप उमेदवाराला हरवू असा इशारा जगदीश शेट्टर यांनी दिला आहे. तर, माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी अथणी मतदारसंघाचे तिकीट न मिळाल्याने, आपण भिकेचा कटोरा घेऊन फिरणार नाही असे सांगितले. त्यांची समजूत काढण्यासाठी गेलेल्या भाजप नेत्यांना त्यांच्या समर्थकांनी पळवून लावल्याचे वृत्त आहे.

भाजपसाठी धोक्याची घंटा
कुमारस्वामी, शेट्टर आणि सवदी हे तिघेही प्रभावशाली लिंगायत नेते मानले जातात. त्यांच्यासह इतरांची नाराजी ही भाजपसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. ईश्वरप्पासमर्थक आमदार आर. शंकर व अनेक पक्षनेत्यांनी भाजपपासून फारकत घेतली आहे. आपण निवडणूक लढविणार नाही, असे नाराजीपत्र दिल्लीला पाठवणारे ईश्वरप्पा हे १० टक्के लोकसंख्येच्या कुरबा समाजात भक्कम स्थान राखून आहेत.

Stay Connected

1,567FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या