लखनौ : योगी सरकारमधील जलशक्ती राज्यमंत्री दिनेश खाटिक यांनी आपला राजीनामा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे पाठविला आहे. या राजीनाम्यात दिनेश खाटिक यांनी अधिका-यांवर लक्ष न दिल्याचा आणि दलितांना योग्य सन्मान मिळत नसल्याचा आरोप केला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनेश खाटिक यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राजभवन यांनाही राजीनामा पाठवला आहे. मी दलित असल्यामुळे माझे विभागात कोणी ऐकत नाही, तसेच कोणत्याही बैठकीची मला माहिती दिली जात नाही, असा आरोप राज्यमंत्री खाटिक यांनी केला आहे. राज्यमंत्र्यांचा अधिकार म्हणून मला केवळ वाहनच देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, बदली प्रकरणात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही मंत्री खाटिक यांनी केला आहे. बदलीतील घोटाळ्याबाबत खाटिक यांनी अधिका-यांकडे माहिती मागितली असता, त्यांना अद्याप माहिती देण्यात आलेली नाही आहे. प्रधान सचिव पाटबंधारे यांच्यावर आरोप करत राज्यमंत्री खाटिक म्हणाले, माझे संपूर्ण बोलणे ऐकून न घेता अधिका-यांनी फोन कट केला असे त्यांनी स्पष्ट केले. नमामि गंगे योजनेतील भ्रष्टाचाराबाबतही त्यांनी राजीनामा पत्रात उल्लेख केला आहे.