32.3 C
Latur
Sunday, April 11, 2021
Homeराष्ट्रीयसुरजेवाला, चंडी यांचेवर जागावाटपाची जबाबदारी

सुरजेवाला, चंडी यांचेवर जागावाटपाची जबाबदारी

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : तामिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी द्रमुकसमवेत जागा वाटपासाठी काँगे्रसने दुस-या फळीतील परंतु राहुल गांधींचे विश्वासू मानले जाणारे सरचिटणीस रणदीप सुरजेवाला आणि केरळचे माजी मुख्यमंत्री ओमेन चंडी यांची नियुक्ती केली आहे. एकत्रितपणे निवडणूक लढविण्यासाठी दोन्ही पक्ष आधीच सहमत झाले आहेत.

काँग्रेसतर्फे याआधी गुलाम नबी आझाद, ए. के. अ‍ॅन्टनी यांच्यासारखे ज्येष्ठ नेते जागा वाटपासाठी वाटाघाटी करत होते. आता ही जबाबदारी दुस-या फळीतील नेत्यांकडे आली आहे. कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींच्या निर्णयानुसार आंध्रप्रदेशचे प्रभारी सरचिटणीस ओमेन चंडी आणि कर्नाटकचे प्रभारी सरचिटणीस रणदीप सुरजेवाला हे चेन्नईत द्रमुक सर्वेसर्वा एम. के. स्टॅलिन यांच्याशी जागा वाटपाची चर्चा करतील.

तामिळनाडूचे प्रभारी दिनेश गुंडूराव यांचा अल्प अनुभव पाहता दिल्लीहून वाटाघाटींसाठी वरिष्ठ नेत्यांना पाठविले आहे. त्यातही राहुल गांधींच्या निकटवर्तीय वर्तुळात प्रवेश केलेल्या रणदीप सुरजेवाला यांचे पक्षातील महत्त्व आणखी वाढल्याचे मानले जात आहे. याआधी सुरजेवाला यांना बिहार विधानसभा निवडणुकीत आणि राजस्थानमध्ये सचिन पायलट यांच्या बंडानंतरच्या अस्थिरतेच्या परिस्थितीत काँंग्रेस नेतृत्वाने निरीक्षक आणि मध्यस्थ पदाची जबाबदारी सोपविली होती.

गुलाम नबी आझाद यांना सक्तीची विश्रांती
सोनिया यांच्या या निर्णयामुळे राज्यसभेच्या विरोधी पक्ष नेतेपदावरून निवृत्त झालेल्या गुलाम नबी आझाद यांना आता संघटनेच्या कामातूनही सक्तीची विश्रांती मिळाली आहे. तर, नाराज ज्येष्ठ नेत्यांना चुकारण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांचाही यासाठी विचार झालेला नाही.

द्रमुकची पाच सदस्यीय समिती
२३४ सदस्य संख्या असलेल्या तामिळनाडू विधानसभेची मुदत २४ मेस संपुष्टात येणार असून लवकरच या राज्यासह पश्चिम बंगाल, पुदुच्चेरी, केरळ आणि आसाम या राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. तामिळनाडूमध्ये विरोधी पक्षात असलेल्या द्रमुकचे ९७ तर कॉंग्रेसचे सात आमदार आहेत. काँंग्रेसशी जागावाटपासाठी द्रमुकने आधीच पाच सदस्यांची समिती नेमली आहे.

महागाईचा भडका

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,473FansLike
162FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या