नवी दिल्ली : महागाईने होरपळणा-या सामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारकडून गेल्या काही दिवसांपासून मोठे निर्णय घेतले जात आहेत. काही दिवसांपूर्वी केंद्राने गव्हाच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. त्यापाठोपाठ आता केंद्राकडून १ जूनपासून साखरेच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता खाद्यतेलानंतर साखरेच्या किमतीही कमी होण्यास मदत होणार आहे. ३१ ऑक्टोबरपर्यंत ही निर्यातबंदी असणार आहे.
या वर्षी देशात साखरेचे विक्रमी उत्पादन झाले आहे. त्यामुळे देशांतर्गत साखरेचे दर मोठ्या प्रमाणात वाढले होते. यामुळे सामान्य नागरिकांचे आर्थिक गणित कोलमडले होते. दरम्यान, वाढत्या साखरेच्या किमतींवर नियंत्रण मिळवण्यासाठी अखेर केंद्रातर्फे ३१ ऑक्टोबरपर्यंत निर्यातीवर बंदी घालण्यात आली आहे. मात्र या निर्णयामुळे साखर कारखान्यांचे अर्थकारण बिघडण्याचीही शक्यता आहे.