लखनौ : उत्तर प्रदेशात शुक्रवारच्या नमाजनंतर मोठा हिंसाचार उसळला होता. यानंतर, आता पोलीस आरोपींचा शोध घेऊन त्यांना बाहेर काढत आहेत. दंगलीतील आरोपींसोबत कठोरपणे वागा, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पोलिसांना दिले आहेत. उत्तर प्रदेशात आरोपींना पकडण्याची जोरदार मोहीम सुरू आहे.
यातच, देवरियाचे भाजप आमदार आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे माजी माध्यम सल्लागार शलभ मणी त्रिपाठी यांनी एक व्हीडीओ ट्विट केला आहे. या व्हिडीओत पोलिस दंगलीतील आरोपींना काठीने मारताना दिसत आहेत. नुपूर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबरांसंदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात झालेल्या हिंसक निदर्शनांनंतर, पोलिसांनी दंगेखोरांवर केलेल्या कारवाईला त्रिपाठी यांनी ‘रिटर्न गिफ्ट’, असे म्हटले आहे. व्हीडीओ ट्विट करताना, त्यानी ‘दंगेखोरांना रिटर्न गिफ्ट’, असे कॅप्शन दिले आहे.
भाजप आमदार त्रिपाठी यांच्या या ट्विटवर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. ३० सेकंदांच्या या व्हीडीओमध्ये दोन पोलिस कर्मचारी एका गटाला काठीने मारताना दिसत आहेत. त्रिपाठी यांनी पोलिसांच्या या कारवाईला ‘रिटर्न गिफ्ट’ म्हटल्याबद्दल अनेक पत्रकारांनी त्यांचा निषेध केला आहे. तर, अनेकांनी त्रिपाठी यांचे समर्थन करत, दंगेखोरांना रोखण्यासाठी पोलीस कारवाईची आवश्यकता असल्याचे म्हटले आहे.