नवी दिल्ली : एकीकडे महागाईने सर्वसामान्य जनता बेजार झाली आहे. तर दुसरीकडे काहीसा दिलासा मिळाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सातत्याने कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये चढ-उतार होताना दिसत आहेत. असे असले तरी, खाद्य तेलाच्या किमतींत मात्र सातत्याने घट होत असल्याचे पाहायला मिळत आहे. सोयाबीन तेल, सीपीओ, कापूस बियाणे आणि पामोलिन तेलाच्या दरात घसरण होताना दिसत आहे. मोहरी आणि शेंगदाणा तेल-तेलबियांचे दर मात्र स्थिर आहेत.
तज्ज्ञांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, सोयाबीन वगळता बाजारात इतर कोणत्याही तेलबियांना मागणी नाही. याशिवाय शिकागो एक्सचेंजमधील मंदीमुळे सोयाबीन तेलाच्या किमतीत घसरण झाली आहे. बाजारातील मोहरी आणि भुईमूगाची आवक घटू लागली असल्याचं सूत्रांनी सांगितले आहे. बुधवारी बाजारात मोहरीची आवक सुमारे पाच लाख पोत्यांवरून घटून साडेचार लाख पोत्यांवर आली आहे.
मोहरीपासून सध्या मोठ्या प्रमाणावर रिफाईंड तेल तयार केले जात आहे. त्यामुळे पुढच्या काही दिवसांत बाजारात मोहरीचा तुटवडा जाणवण्याची शक्यता आहे. मोहरीच्या पिकाची पुढची खेप येण्यासाठी आणखी ९ ते १० महिने लागणार आहेत. त्यामुळे बाजारात मोहरीचा तुटवडा जाणवू नये, यासाठी सरकारने योग्य वेळी खबरदारी घेणे गरजेचे आहे.
सरकारने मोहरीचा साठा करावा
केंद्र तसेच राज्य सरकारच्या खरेदी संस्थांना मोहरीच्या तेलबिया खरेदी करून त्याचा साठा करून घेण्याचं आवाहन करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. हे गरजेच्या वेळी देशाच्या हिताचं ठरेल. मोहरीला पर्याय नसल्यानं सरकारला सतर्क राहावे लागणार आहे.
किमतीत घसरण
सूत्रांनी सांगितले की, मलेशिया एक्सचेंज सुमारे अर्धा टक्का खाली होता, तर शिकागो एक्सचेंज देखील १.८ टक्क्यांच्या आसपास होता. परदेशातील बाजारातील घसरणीमुळे सोयाबीन तेल, कच्चे पामतेल (सीपीओ), कापूस बियाणे आणि पामोलिन तेलाच्या किमतीत घसरण झाल्याचं सूत्रांनी सांगितले.