नवी दिल्ली : जदयूचे माजी अध्यक्ष आणि सध्याचे राजदचे नेते शरद यादव यांचे आज निधन झाले. भारताच्या राजकारणात समाजवादी आंदोलनाचे एक वेगळे महत्त्व आहे. त्याच समाजवादी आंदोलनातून पुढे आलेल्या नेत्यांमध्ये शरद यादव यांचे एक वेगळे स्थान होते. शरद यादव यांच्या कन्या सुभाशिनी यादव यांनी एक ट्विट करून वडिलांचे निधन झाल्याची माहिती दिली.
ज्येष्ठ नेते शरद यादव यांनी १९७४ पासून संसदीय राजकारणात खासदार म्हणून पाऊल टाकले. तेव्हापासून त्यांनी सातवेळा खासदार म्हणून संसदेत प्रतिनिधित्व केले. शरद यादव यांनी उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि बिहार या तीन राज्यांमधून लोकसभेवर खासदार म्हणून काम केले आहे. अशा या ज्येष्ठ नेत्याचे वयाच्या ७५ व्या वर्षी निधन झाले आहे. सुभाशिनी यादव यांनी पापा नही रहे, असे ट्विट केले आहे.
शरद यादव यांनी गुरुग्रामच्या फोर्टिस रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी च्यांच्या सरकारमध्ये शरद यादव यांनी मंत्रिपदावर काम केले. ते २००३ मध्ये जेडीयूचे अध्यक्ष बनले होते. २००४ च्या लोकसभेत पराभव झाल्यानंतर शरद यादव यांनी राज्यसभेवर काम केले. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत ते मधेपुरा मतदारसंघातून विजयी झाले. मात्र, २०१७ मध्ये नितीशकुमार यांच्यासोबत मतभेद निर्माण झाल्यानंतर राज्यसभेचे सदस्यत्व सोडावे लागले होते. त्यानंतर २०१८ मध्ये त्यांनी लोकतांत्रिक जनता दलाची स्थापना केली होती. मार्च २०२२ मध्ये शरद यादव यांनी लोकतांत्रिक जनता दल राजदमध्ये विलीन केला. शरद यादव हे मूळचे मध्य प्रदेशमधील होते. त्यांनी शेतकरी, कामगारांच्या मुद्यांवर काम केले.
शरद यादव यांचा जन्म १९४७ मध्ये मध्य प्रदेशच्या होशंगाबादमध्ये झाला होता. त्यांनी १९७१ मध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले होते. डॉ. राम मनोहर लोहिया यांच्या विचारांनी प्रेरित होऊन शरद यादव यांनी अनेक आंदोलनांत सहभाग घेतला. १९६९-७०, १९७२, १९७५ मध्ये मिसा कायद्याअंतर्गत त्यांनी कारावास भोगला. मध्य प्रदेशच्या जबलपूर लोकसभा मतदारसंघातून १९७४ ला ते खासदार झाले. तेव्हापासून त्यांची संसदीय राजकारणात होते. त्यांच्या निधनाने समावादी विचाराची मोठी हानी झाल्याची प्रतिक्रिया उमटत आहेत.