22.1 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeराष्ट्रीयतक्रारींचा निपटारा आता ३० दिवसांत!

तक्रारींचा निपटारा आता ३० दिवसांत!

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : केंद्र सरकारने सरकारी पोर्टलवर नोंदवल्या जाणा-या तक्रारींचे निवारण करण्याची मुदत ४५ दिवसांवरून कमाल ३० दिवसांपर्यंत कमी केली आहे. यासोबतच तातडीच्या तक्रारींच्या सुनावणीला प्राधान्य दिले जाणार आहे. गेल्या वर्षी डीएआरपीजीने सार्वजनिक तक्रारींचे निराकरण करण्यासाठी कमाल मर्यादा ६० दिवसांवरून ४५ दिवसांपर्यंत कमी केली होती. आता या तक्रारींचा निपटारा लवकरात लवकर व्हावा, म्हणून हा कालावधीही कमी केला असून, आता नव्या आदेशानुसार अवघ्या ३० दिवसांत तक्रारींचा निपटारा करावा लागणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्यालयीन कामकाजांच्या दिरंगाईवर बडगा उगारला असून, ऑनलाईन येणा-या तक्रारी तात्काळ निकाली निघाव्यात यासाठी तक्रारींच्या निपटा-याचा कालावधी कमी केला आहे. याशिवाय नागरिकांकडून आलेली तक्रार त्याच्या विरोधात दाखल केलेले अपील निकाली निघेपर्यंत ती बंद केली जाणार नाही, असा निर्णयही घेण्यात आला आहे. जर तक्रारदाराने त्याच्याविरुद्ध अपील दाखल केले नसेल तर तत्सम निकाली काढलेली तक्रार बंद समजली जाईल. प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभागाने या संदर्भात एक आदेश जारी केला आहे. त्यात नमूद करण्यात आले आहे की, निकाली काढलेल्या तक्रारीविरुद्ध नागरिकांकडून अपील प्राप्त झाल्यास ती निकाली काढल्यानंतरच तक्रार बंद मानली जाणार आहे.

डीएआरपीजी केंद्रीय कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असून, केंद्रीकृत सार्वजनिक तक्रार निवारण आणि देखरेख प्रणालीत व्यापक सुधारणा करण्यात आल्याचे विभागाकडून सांगण्यात आले. नागरिकांच्या गरजांना अधिक प्रतिसाद देण्यासाठी अनेक पावले उचलण्यात आली असल्याचेही विभागाने म्हटले आहे.
सीबीजीआरएएमएसवर प्राप्त झालेल्या तक्रारी मिळताच त्यांचे निराकरण केले जाईल. परंतु यासाठी कमाल वेळ मर्यादा आता ३० दिवसांची असेल. विचाराधीन बाबी किंवा धोरणात्मक मुद्यांवर विहित मुदतीत निकाली काढणे शक्य नसल्यास तडजोड का होऊ शकली नाही, याचे उत्तर तक्रारदार नागरिकास दिले जाईल, असेही यात स्पष्ट करण्यात आले आहे.

पहिल्या ३ महिन्यांत १३ लाखांवर तक्रारी
यावर्षी जानेवारी ते मार्च या पहिल्या तीन महिन्यांत १३,३२,५६७ तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्यापैकी ४,१८,४५१ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला आहे, तर मागील वर्षी याच कालावधीत म्हणजेच २०२१ मध्ये ३०,२३,८९४ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी २१,३५,९२३ तक्रारींचा निपटारा करण्यात आला होता. २०२० मध्ये ३३,४२,८७३ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यातील २३,१९,५६९ तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या