चेन्नई : निवार चक्रीवादळाने गुरुवारी पहाटे अंधारातच तमिळनाडू, पुद्दुच्चेरीला धडक दिली. मात्र किनारपट्टीसह अंतर्गत भागात कोणतेही नुकसान न करता पुढे गेले. भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, चक्रीवादळाचा धोका कमी झाला आहे. मात्र तटीय भागांत जोराच्या वाºयासह मुसळधार पाऊस पडत आहे.पद्दुच्चेरी, तमिळनाडूच्या कराईकल, नागापट्टनम आणि चेन्नईमध्ये कालपासून पाऊस सुरू आहे. पावसामुळे अधिकांश भागात पाणी भरले आहे. निवार चक्रीवादळाच्या तमिळनाडू आणि पुद्दुच्चेरी भागातील स्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. याबाबत तामिळनाडूचे मुख्यमंत्री ई.पलानीस्वामी तसेच पुद्दुच्चेरीचे मुख्यमंत्री व्ही.नारायणस्वामी यांच्याशी कायम संवाद सुरु असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले आहे.
चक्रीवादळाचा विशेष फटका नाही
दरम्यान, हवामान विभागाकडून चेन्नईसहीत अनेक भागांत मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. चक्रीवादळाचा फटका फारसा झाला नसल्याचे तामिळनाडूच्या वल्लूपूरम जिल्ह्यातील मच्छिमारांनी म्हटले आहे. वादळाच्या तयारीच्या दृष्टिकोनातून चेन्नईमध्ये एनडीआरएफने अनेक नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवले होते. तामिळनाडू प्रशासनातर्फे किनारपट्टीवरील १ लाख २० हजार नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले होते. चेन्नई विमानतळ आज सकाळी ९.०० वाजेपर्यंत बंद ठेवले होते.