नवी दिल्ली : विधान परिषदेच्या निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर महाविकास आघाडीत धुसफूस बाहेर येऊ लागली आहे. भाजपने पाचही जागा निवडून आणल्यानंतर सत्ताधाऱ्यांमध्ये ब्लेमगेमला सुरुवात झाली आहे. राज्यसभेला भाजपाला १२३ मते मिळाली होती. मात्र विधानपरिषदेला १३३ मते मिळाल्याने काँग्रेस आणि शिवसेनेची मते फुटल्याचं समोर आले आहे. भाजप नेते संजय कुटे आणि एकनाथ शिंदे यांच्यात बैठक सुरू आहे. महाविकास आघाडीची एकूण २१ मतं आणि शिवसेनेच्या गोटातील दहा मतांचा सौदा झाल्याची चर्चा आहे.
याच पार्श्वभूमीवर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी माघारी मतदारसंघात निघालेल्या आमदारांना पुन्हा मुंबईत बोलावले आहे. शिवसेनेतर्फे तातडीने बैठक बोलवण्यात आली आहे. मात्र, निकालानंतर एकनाथ शिंदे यांचा गट नाराज असल्याचं दिसतंय. शिंदे यांचा कालपासून फोन नॉट रिचेबल आहे. ते गुजरातमध्ये असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आजच्या बैठकीला शिंदे उपस्थित राहतात की नाही, याकडे सर्वांचं लक्ष्य लागले आहे.
सूरतमधल्या हॉटेलमध्ये सध्या असलेले शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडाला आता वेगळंच वळण लागण्याची शक्यता आहे. देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय मानले जाणारे भाजपाचे आमदार संजय कुटे हे एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी जाणार आहेत.