नवी दिल्ली : श्रद्धा वालकर हत्याकांडाप्रकरणी दिल्लीच्या साकेत कोर्टात सुरू असणारी सुनावणी ९ मेपर्यंत स्थगित झाली आहे. आज कोर्टात या प्रकरणातील मुख्य आरोपी आफताब पुनावालाविरोधात निश्चित झालेले आरोप जाहीर होणार होते. कोर्टाने गत १५ एप्रिल रोजीच आफताबवरील आरोप निश्चित केले होते. दुसरीकडे, दिल्ली पोलिसांना शनिवारी श्रद्धाच्या वडिलांनी श्रद्धाचे अवशेष मागण्यासंबंधी केलेल्या मागणीवर आपले उत्तर द्यायचे होते.
श्रद्धाचे वडील विकास वालकर यांनी कोर्टात एक याचिका दाखल करून श्रद्धाच्या अवशेषांची मागणी केली होती. त्यांची आपल्या मुलीवर अंत्यसंस्कार करण्याची इच्छा आहे. यावर स्पेशल पब्लिक प्रोसिक्यूटर अमित प्रसाद म्हणाले होते की, दिल्ली पोलिस सुनावणीच्या पुढील तारखेला या प्रकरणी आपली बाजू स्पष्ट करतील.
पुढील महिन्यात श्रद्धा हत्याकांडाची वर्षपूर्ती
श्रद्धाला न्याय मिळत नाही तोपर्यंत श्रद्धावर अंत्यसंस्कार न करण्याची शपथ विकास यांनी घेतली होती. त्यांनी मार्च २०२३ मध्ये सांगितले होते की, माझ्या मुलीच्या हत्येला मे महिन्यात एक वर्ष पूर्ण होईल, परंतु मी अद्याप तिच्यावर अंत्यसंस्कार केलेले नाहीत. आफताबला फाशीची शिक्षा झाल्यानंतरच मी श्राद्ध करेन.
घराचे सील काढण्याची मागणी
केस संपल्यानंतरच माझ्या मुलीच्या मृतदेहाचे अवशेष मला सुपूर्द केले जातील, असे विकासने सांगितले होते. पण खटला कधी संपणार आणि माझ्या मुलीवर अंतिम संस्कार कधी होणार हा प्रश्नच आहे. दुसरीकडे, दिल्लीतील ज्या घरात श्रद्धाची हत्या झाली होती. त्या घराच्या मालकाने घरावरील सील काढण्याची मागणी न्यायालयाकडे केली होती. न्यायालयाने वकिलाला यासाठी अर्ज करण्यास सांगितले होते.