नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मनीष सिसोदिया व सत्येंद्र जैन यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या जागी आप आमदार आतिशी व सौरभ भारद्वाज यांची नावे नायब राज्यपालांकडे पाठवली आहेत. भारद्वाज पक्षाचे प्रवक्ते व दिल्ली जल मंडळाचे उपाध्यक्ष आहेत. सिसोदियांच्या शिक्षणविषयक गटाच्या सदस्य असा आतिशींचा परिचय आहे.
आप आमदारांच्या बैठकीनंतर केजरीवाल म्हणाले, पंतप्रधानांनी आमच्या दोन सर्वात चांगल्या मंत्र्यांना अटक केली. अबकारी कर तर बहाणा आहे. मनीष यांनी शिक्षण क्षेत्रात चांगले केले नसते तर त्यांना अटक झाली नसती. मनीष तसेच सत्येंद्र यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला तर उद्या त्यांची सुटका होणार नाही का? असा सवाल करुन सीबीआय व ईडीच्या माध्यमातून विरोधकांना त्रास दिला जात आहे असा आरोप केजरीवाल यांनी केला. तर तपास पुढे जात आहे. तो केजरीवालांपर्यंत येत आहे अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रवक्ते गौरव भाटिया यांनी दिली.