कोलकाता : भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी पश्चिम बंगालमधील परगणा येथील सीमाभागात सोन्याची तस्करी करणा-यांना पकडले आहे. त्यांच्याकडून सोन्याची ७४ बिस्किटे जप्त करण्यात आली आहेत. दरम्यान दोन वेळा झालेल्या या धाडीत जप्त करण्यात आलेल्या सोन्याची किंमत ही ६ कोटी १५ लाख असल्याचे सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी सांगितले आहे.
पश्चिम बंगालमधील उत्तर परगणा या भागात झालेल्या धाडीत ११.६२ किलो सोने जप्त करण्यात आले आहे. बांगलादेशातून सीमा सुरक्षा दलाच्या जवानांची नजर चुकवून हे सोने भारतात आणले जात होते. जप्त करण्यात आलेल्या सोन्याची किंमत ६ कोटी १५ लाख १८ हजार एवढी असल्याचे जवानांनी सांगितले. पहिल्या धाडीत बांगलादेशमधून भारतात येणा-या एका ट्रकची तपासणी सुरक्षा दलाच्या जवानांनी केली त्यावेळी त्यांना गाडीत काळ्या कपड्यात गुंडाळलेला बॉक्स सापडला होता.
ड्रायव्हर सीटच्या पाठीमागे हा बॉक्स सापडला असून त्यात त्यांना ११.६२ किलो वजनाची सोन्याची ७० बिस्किटे आणि तीन पट्ट्या सापडल्या. त्यानंतर हा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्याचबरोबर ट्रकचालकाला ताब्यात घेण्यात आले असून त्याची चौकशी सुरू असल्याचे सुरक्षा दलाच्या जवानांनी सांगितले आहे.