नवी दिल्ली : देशभरात अग्निपथ योजनेवरून सुरू असलेल्या निषेधाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे.
राजनाथ सिंह म्हणाले, ‘आमच्या सरकारने अग्निपथ योजना आणली आहे. काही लोक यामध्ये संभ्रम निर्माण करत आहेत अथवा कदाचित नवीन योजना आहे, त्यामुळे काही गैरसमजही आहेत.
ही योजना बनवण्यापूर्वी आम्ही खूप चर्चा केली आहे. दीड वर्षापासून त्याची तयारी करण्यात आली आहे. मात्र, देशातील नागरिकांची देशाप्रति बांधीलकी असावी, अशी आमची इच्छा आहे.
ते पुढे म्हणाले, ही चार वर्षांची सेवा आहे. चार वर्षे संपल्यानंतर, अग्निवीरांच्या हातात ११ लाख ७१ हजार रुपये असणार आहेत. शिवाय, हायस्कूलनंतर प्रवेश घेतल्यास त्यांना इंटर प्रमाणपत्र मिळेल, तर इंटरचे शिक्षण घेतल्यानंतर प्रवेश घेतल्यास त्यांना डिप्लोमा प्रमाणपत्र मिळणार आहे.
अग्निपथ योजनेमुळे संरक्षण क्षेत्रात क्रांतिकारी बदल होणार आहेत. मात्र, काही लोक अग्निपथच्या विरोधात गैरसमज पसरवत आहेत. अग्निवीरांना रोजगाराच्या नवीन संधी मिळणार आहेत. अनेक राज्य सरकारांनी अग्निशमन दलाला रोजगार देण्याचे मान्य केले आहे. तसेच सार्वजनिक क्षेत्राने अग्निवीरांना रोजगार देण्याचे आश्वासन दिल्याचे राजनाथ सिंह यांनी यावेळी स्पष्ट केले.