नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना अधीर रंजन चौधरी यांनी ‘राष्ट्रपत्नी’ संबोधल्याने झालेला गोंधळ थांबत नाही आहे. सभागृहाचे कामकाज तहकूब करून सोनिया गांधी बाहेर येत असताना भाजप खासदारांनी घोषणाबाजी सुरू केली. स्मृती इराणी बोलल्या असता सोनिया गांधी भडकल्या. मला तुमच्याशी बोलायचे नाही, सोनिया गांधी म्हणाल्या. प्रत्युत्तरात स्मृती इराणीही काही बोलल्या. यामुळे सुमारे दोन मिनिटे दोघांमध्ये वादावादी झाली.
‘राष्ट्रपत्नी’वरून भाजपकडून राज्यसभा व लोकसभेत बराच गदारोळ झाला होता. यानंतर सभागृहाबाहेर सोनिया गांधी आणि स्मृती इराणी यांच्यात जोरदार वादावादी झाली. सोनिया गांधी यांनी भाजप खासदार रमा देवी यांना अधीर रंजन चौधरी यांनी माफी मागितली असे सांगितले. दरम्यान, स्मृती इराणी यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता सोनिया गांधी भडकल्या.
संसदेत विरोधक व सत्ताधारी यांच्यात कटुता वाढली असून, दुरावा निर्माण होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. स्मृती इराणी संसदेतही या मुद्द्यावरून आक्रमक झाल्या होत्या. अधीर रंजन चौधरी यांनी सोनिया गांधी यांच्या परवानगीनेच असे वक्तव्य केले आहे. त्यामुळे सोनिया गांधींनी स्वत: देशाची माफी मागावी, असे स्मृती इराणी म्हणाल्या.