30.3 C
Latur
Monday, May 10, 2021
Homeराष्ट्रीयघरोघरी जाऊन घेणार रुग्णांचा शोध!

घरोघरी जाऊन घेणार रुग्णांचा शोध!

एकमत ऑनलाईन

उत्तर प्रदेशातील दस्तक योजनेच्या धर्तीवर राबविणार योजना

नवी दिल्ली : देशातील कोणत्याही राज्यापेक्षा महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या अधिक आहे. तसेच रोजच्या रोज ही रुग्णसंख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाला रोखण्याचे आव्हान स्वीकारले असून यापुढे घरोघरी जाऊन कोरोना रुग्ण व त्यांच्या संपर्कातील लोकांना शोधण्याची राज्यव्यापी मोहीम राबविण्यात येणार आहे. उत्तर प्रदेशमधील ‘दस्तक’ योजनेच्या धर्तीवर ही योजना असून यात लोक व लोकप्रतिनिधींनाही सहभागी करून घेतले जाणार आहे.

मुंबईसह राज्यातील वेगवेगळी शहरे तसेच ग्रामीण भागात कोरोना रुग्ण वाढणे तसेच कोरोना पसरण्याची कारणे वेगवेगळी आहेत. यात लोकसंख्येची घनता, झोपडपट्टी, सार्वजनिक स्वच्छता गृह, चाचण्यांचे प्रमाण, रुग्ण व रुग्ण संपर्कातील लोक अशी वेगवेगळी कारणे आहेत. त्याचप्रमाणे यात काही समान दुवे असून त्याचा विचार करून कोरोना रोखण्यासाठी राज्यव्यापी मोहीम आखण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कोरोनाच्या सुरुवातीपासूनच सातत्याने आरोग्य क्षेत्रातील तसेच प्रशासकीय यंत्रणेतील तज्ज्ञांच्या संपर्कात असतात. सातत्याने देशातील वेगवेगळ््या राज्यांनी कोरोना रोखण्यासाठी केलेल्या व करत असलेल्या उपाययोजनांची माहिती घेत असतात. मुंबईसाठी जशी कृती समिती बनविण्यात आली आहे. तसेच राज्यासह देशातील आरोग्य तज्ज्ञांंबरोबर अनेकवेळा बैठका होत असतात. यात मुंबईतील डॉ. संजय ओक, डॉ. अविनाश सुपे, डॉ. शशांक जोशी, डॉ. राहुल पंडित यांच्यापासून राज्य व देशातील अनेक नामांकित डॉक्टरांबरोबर नियमित संवाद ठेवून असून, वेळोवेळी आवश्यक त्या उपाययोजना करून कोरोनाला कसे रोखता येईल, यासाठी ते प्रयत्नशील आहेत.

या पार्श्वभूमीवर मागच्या आठवड्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत एक तज्ज्ञ डॉक्टरांची बैठक झाली. यावेळी उत्तर प्रदेश राज्याचे कोरोना व आरोग्य विषयक प्रमुख सल्लागार डॉ. सचिन गुप्ते यांच्याशी या मुद्यावर सखोल चर्चा झाली. मुंबईतील जे. जे. रुग्णालय व ग्रँट वैद्यकीय महाविद्यालयातून शिक्षण झालेले डॉ. सचिन गुप्ते यांनी उत्तर प्रदेशमधील ‘दस्तक’ योजनेची माहिती दिली. ‘दस्तक’ योजनेतून घरोघरी जाऊन कोरोना रुग्ण व रुग्ण संपर्कातील राबवलेली शोधमोहीम व त्याचे परिणाम डॉ. गुप्ते यांनी सांगितले. यानंतर महाराष्ट्राचा सर्वार्थाने विचार करून घरोघरी कोरोना रुग्ण व रुग्ण संपर्कातील लोकांचा शोध घेण्याचा संकल्प मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला.

सप्टेंबरच्या मध्यापासून शुभारंभ
उत्तर प्रदेशातील दस्तक योजनेच्या धर्तीवर राज्यातही योजना सुरू करण्यात येत असून, सप्टेंबरच्या मध्यापासून ही योजना सुरू होऊ शकते. या योजनेत शहरी व ग्रामीण भागात पसरणारा कोरोना, व्यापक जनजागृती, लोक व लोकप्रतिनिधी सहभाग, कोमॉर्बीड लोकांचा, वृद्ध लोकांचा विचार, आरोग्य शिक्षण, चाचण्यांची व्यवस्था, रुग्ण आढळल्यास तात्काळ करायचे उपचार आदी वेगवेगळ््या प्रकारे विचार करून सर्वंकष योजना तयार करण्याचे काम सुरू आहे. सप्टेंबरच्या मध्यावधीपासून महिनाभर ही योजना राज्यात घरोघरी राबवली जाणार आहे. याचबरोबर सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापरणे आणि स्वच्छता पालन ही त्रिसूत्री लोकप्रतिनिधी व लोकसहभागातून राबवली जाणार आहे,असेही सांगण्यात आले.

व्यापक शोध आवश्यक
आजघडीला राज्यात दोन लाखांहून अधिक अ‍ॅक्टिव्ह म्हणजे रुग्णालयात दाखल करून उपचाराची गरज असलेले रुग्ण आहेत. यात मुंबई व ठाण्यात प्रत्येकी २० हजारांहून जास्त रुग्णसंख्या आहे. पुण्यात ५४,७६० रुग्ण आहेत. याशिवाय कोल्हापूर, सांगली, सातारा, जळगाव, नंदुरबार, धुळे, औरंगाबाद, उस्मानाबाद, नांदेड व चंद्रपूर आदी ठिकाणीही कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. या पार्श्वभूमीवर रुग्ण व रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा वेगाने व व्यापक शोध घेण्याची गरज आहे. त्यादृष्टीने राज्य सरकार प्रयत्नशील आहे.

जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश जारी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,494FansLike
184FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या