चेन्नई : तमिलनाडूच्या कल्लाकुरीची जिल्ह्यातील चिनाना सालेम येथील खासगी उच्च माध्यमिक शाळेतील बारावीच्या विद्यार्थिनीने मंगळवारी रात्री शिक्षकांवर छळाचा आरोप करून आत्महत्या केली होती. याचे पडसाद रविवारी (ता. १७) उमटले. मृत विद्यार्थिनीला न्याय मिळावा यासाठी आंदोलकांनी शाळेच्या आवारात प्रवेश करीत बसेस आणि पोलिसांच्या वाहनांना आग लावली.
प्राप्त माहितीनुसार, खासगी उच्च माध्यमिक शाळेतील बारावीच्या विद्यार्थिनीने मंगळवारी रात्री आत्महत्या केली होती. वसतिगृहाच्या तिस-या माळ्यावरील खोलीतून विद्यार्थिनीने उडी मारत जीवन संपवले होते. विद्यार्थिनीच्या आत्महत्येप्रकरणी शाळा प्रशासनाला दोषी ठरवत कारवाई करावी यासाठी १६ जुलै रोजी सलग चौथ्या दिवशी आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी विद्यार्थिनीच्या मृत्यू प्रकरणी सीआयडी चौकशीची मागणी केली आहे. तसेच मृत्यूला जबाबदार असलेल्यांना अटक करण्याची मागणी केली. त्यांच्या मागण्यांना राजकीय संघटना आणि डाव्या पक्षाच्या युवा शाखेचा पांिठंबा आहे. आंदोलक रविवारी बॅरिकेड्स पाडून शाळेच्या आवारात घुसले आणि संस्थेच्या आवारात उभ्या असलेल्या बसेस पेटवून दिल्या, असे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांवर दगडफेक
हिंसाचार नियंत्रणात आणण्यासाठी कल्लाकुरीची जिल्हा पोलिसांनी सौम्य बळाचा वापर केला. यानंतर आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक सुरू केली. या घटनेत १० हून अधिक पोलिस जखमी झाले आहेत. पोलिस महासंचालक सी सिलेंद्र बाबू यांनी शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. हिंसाचार करणा-यांवर कठोर कारवाई केली जाईल, असेही पोलिस महासंचालक म्हणाले.
न्यायासाठी आंदोलन
मृत्यूपूर्वी विद्यार्थिनीच्या शरीरावर जखमा झाल्या होत्या, असे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. विद्यार्थिनीच्या मृत्यूनंतर आई-वडील, नातेवाईक, कुड्डालोर जिल्ह्यातील वेप्पूर येथील पेरियानासलूर या गावातील लोक न्याय मिळवण्यासाठी न थांबता आंदोलन करीत आहे.