33.7 C
Latur
Saturday, May 28, 2022
Homeराष्ट्रीयस्वदेशी लसीची प्राण्यांवर यशस्वी चाचणी

स्वदेशी लसीची प्राण्यांवर यशस्वी चाचणी

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : देशात कोरोना संक्रमित रुग्णांच्या संख्येत वाढ होत चालल्याचे दिसून येत आहे. याच दरम्यान देशात विकसित होत असलेल्या भारत बायोटेकची कोरोना लस कोव्हॅक्सीनशी निगडीत एक खुशखबर समोर येत आहे. कोव्हॅक्सीन लसीची प्राण्यांवरील चाचणी यशस्वी ठरल्याचे भारत बायोटेककडून जाहीर करण्यात आले. कोव्हॅक्सीनची प्राण्यांवर झालेल्या चाचणीच्या परिणामांची घोषणा करताना भारत बायोटेकला अभिमान वाटत आहे. हा परिणाम लाईव्ह व्हायरल चॅलेंज मॉडेलमध्ये सुरक्षात्मक प्रभाव प्रदर्शित करतो, असे ट्विट भारत बायोटेककडून करण्यात आले.

अमेरिका, ब्रिटन, रशिया, चीन, जर्मनी आणि फ्रान्स या देशांप्रमाणे भारतानेही कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी स्वदेशी लशीची निर्मिती केली आहे. हैदराबाद स्थित भारत बायोटेक आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) मिळून कोव्हॅक्सीन या स्वदेशी लसीची निर्मिती केली आहे. सध्या देशभरातील १२ वैद्यकीय संस्थांमध्ये कोव्हॅक्सीन लसीच्या मानवी चाचण्या सुरू आहेत. देशात एकाबाजूला दररोज कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना या कोव्हॅक्सीन लसीचा प्राण्यांवरील चाचणीचा रिपोर्ट समोर आला असून प्राण्यांवरील पहिल्या फेजच्या चाचणीचा रिपोर्ट खूपच उत्साहवर्धक आहे.

लसीची मानवी चाचणी करण्याआधी सुरक्षिततेच्या दृष्टीने प्राण्यांवर चाचणी केली जाते. त्याला प्री-क्लिनिकल चाचणी म्हणतात. यात एकूण २० माकडांना प्रत्येकी पाच याप्रमाणे चार गटांमध्ये विभागण्यात आले होते. त्यांना लसीचे दोन डोस देण्यात आले. माकडांच्या एका गटाला प्लासीबो देण्यात आला. तीन अन्य गटांना तीन वेगवेगळया प्रकारच्या लसीचा पहिला डोस दिला. त्यानंतर १४ दिवसांनी दुसरा डोस दिला. १४ दिवसांनी दुसरा डोस दिल्यानंतर सर्व माकडे व्हायसरच्या संपर्कात आली. त्यानंतरच्या अभ्यासात लसीमुळे माकडांचे व्हायरसपासून संरक्षण झाल्याचे समोर आले.

लस देताच माकडांमधील व्हायरसचा गुणाकार थांबला
ळ माकडांच्या शरीरात व्हायरसचा खात्मा करणा-या अँटीबॉडीज तयार झाल्या आणि नाक, गळा आणि फुफ्फुसांमध्ये व्हायरसचा गुणाकार थांबला. लस दिलेल्या माकडांच्या हिस्टोपॅथोलॉजिकल तपासणीत न्यूमोनियाचे कुठलेही लक्षण आढळले नाही. लसीचे दोन डोस दिलेल्या प्राण्यांमध्ये कुठलेही दुष्परिणाम आढळून आलेले नाहीत. कोव्हॅक्सीन लस दिलेल्या प्राण्यांमध्ये कोरोना विरोधात लढण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती निर्माण झाली. हेच या चाचणीचे यश आहे.

मृत व्हायरसपासून लस विकसित
हैदराबादच्या जिनोम व्हॅलीमध्ये असलेल्या भारत बायोटेकच्या बीएसएल-३ हाय कन्टेंनमेंट फॅसिलिटीमध्येही मृत व्हायरसपासून ही लस विकसित करण्यात आली आहे. या लसीची प्राण्यांवरील चाचणी यशस्वी ठरल्याने वैज्ञानिकांचा आत्मविश्वास बळावला असून, ही लस लवकर उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने वेगाने काम केले जात असल्याचे सांगण्यात आले.

जिल्ह्यात पाच ठिकाणी चोरी, लाखोंचा मुद्दमाल लंपास

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या