नवी दिल्ली: राष्ट्रीय तपास एजन्सीने (एनआयए) बंदी घातलेली संस्था शीख फॉर जस्टिस (एसएफजे) प्रकरणी चौकशीसंदर्भात डझनहून अधिक जणांना समन्स बजावले आहे. यात एक पत्रकार आणि नवीन कृषि कायद्यांविरोधात आंदोलन करणा-या एका शेतकरी नेत्याचाही समावेश आहे. एनआयएने चौकशीसाठी अनेकांना नोटिसा पाठवल्या आहेत. या प्रकरणी काही तथ्यांची खात्री करण्यासाठी साक्षीदार म्हणून त्यांना बोलवल्याची माहिती एनआयएच्या एका अधिका-याने दिली. पत्रकाराशिवाय चौकशीसाठी बोलावलेल्यांच्या व्यवसायाबद्दल आपण विशेष काहीही सांगू शकत नाही, असेही त्यांनी सांगितले. एनआयए समन्स धाडलेल्यांमध्ये आंदोलनप्रकरणी सरकारसोबत चर्चेत भाग घेत असलेल्या लोक भलाई इन्साफ वेल्फेअरचे अध्यक्ष बलदेवसिंग यांचाही समावेश आहे. बलदेवसिंग यांच्याखेरीज सुरेंद्रसिंग टिकरीवाल, पलविंदरसिंग, प्रदीपसिंग, नोबेलजीतसिंग आणि करनैल सिंग यांनाही १७ आणि १८ जानेवारीला एजन्सीसमोर हजर राहण्यास सांगितले आहे.
सिख फॉर जस्टिस आणि बब्बर खालसा इंटरनॅशनल, खलिस्तान टायगर फोर्स, खलिस्तानी जिंदाबाद फोर्स या बेकायदेशीर संघटनांसह विविध खलिस्तानी दहशतवादी संघटनांनी त्यांच्या प्रमुख संघटनांबरोबर कट रचला आहे. भीती व अराजकता निर्माण करणे, लोकांमध्ये असंतोष निर्माण करणे आणि त्यांना सरकारविरूद्ध बंड करण्यास उद्युक्त करणे हा या षडयंत्राचा हेतू आहे, असा आरोप एनआयएने एफआयआरमध्ये केला आहे. अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, जर्मनी आणि इतर देशांमध्ये कार्यरत असलेल्या आयुक्तालयांविरोधात चळवळ उभारणे आणि प्रचारासाठी मोठ्या प्रमाणात निधी गोळा केला जात आहे. दहशतवादी गुरपतवंतसिंग पन्नुन, परमजीतसिंग पम्मा, हरदीपसिंग निज्जर आदींनी ही चळवळ सुरू केली आहे. तरुणांना इंटरनेट आणि सोशल मीडियाद्वारे आंदोलन व दहशतवादी कारवाया करण्यासाठी भडकवत आहेत. भारताचे विभाजन करून स्वतंत्र खालिस्तान राष्ट्र निर्माण करण्याचा त्यांचा कट आहे, असेही एनआयएने एफआयआरमध्ये म्हटले आहे.