24.4 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeराष्ट्रीयपीएफआयचा आवळला फास, एनआयए, एटीएसचे देशभरात छापे

पीएफआयचा आवळला फास, एनआयए, एटीएसचे देशभरात छापे

एकमत ऑनलाईन

१५ राज्यांत तब्बल १०६ जण अटकेत
नवी दिल्ली : पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) विरोधात एनआयए, एटीएसने १५ राज्यांत १०० पेक्षा जास्त ठिकाणी छापे टाकून तब्बल १०६ जणांना अटक केली आहे. यामध्ये पीएफआयच्या अनेक बड्या नेत्यांचा समावेश असून, परभणी, औरंगाबाद, नांदेडसह मराठवाड्यातील १२ जण जाळ््यात अडकले आहेत. या संपूर्ण कारवाईची स्क्रिप्ट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या २९ ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीत लिहिण्यात आल्याचे बोलले जात आहे. पीएफआयच्या हालचाली पाहता शाह यांनी उच्चस्तरीय बैठक बोलावली होती.

महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, आसाम, बिहार, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, पुद्दुचेरी आणि राजस्थानात या धाडी टाकण्यात आल्या. विशेष म्हणजे मराठवाड्यातील नांदेड, परभणी, औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यातही या धाडी टाकण्यात आल्या असून, मराठवाड्यातून जवळपास १२ जणांना अटक केली आहे. त्यात औरंगाबाद जालन्यातून ५, परभणीत ४, नांदेडमध्ये १, बीड जिल्ह्यातील माजलगावमध्ये दोघांना अटक केली आहे. या कारवाईने खळबळ उडाली आहे.

दहशतवादी कारवायाच्या आरोपावरून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पीएफआयवर बंदीची मागणी केली होती. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बैठक घेऊन यासंबंधी पूर्ण नियोजन केले आणि देशभरात एकाचवेळी कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. एएनआयच्या टीमकडून सांगण्यात आले होते की १२ अशा केसेसे आहेत, ज्यामध्ये टेरर मॉडयूल आहेत. याचे संबंध पीएफआयसोबत आहेत. दिल्लीत काही दिवसांपूर्वी जी हिंसा झाली होती. त्याशिवाय पुलवामा येथे जे टेरर मॉड्यूल उघडकीस आले होते. या सर्वामध्ये पीएफआयचा हात असल्याचे समोर आले होते.

या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतलेल्या बैठकीत केंद्रीय गुप्तचर यंत्रणांना माहिती गोळा करून डॉजियर तयार करण्यास सांगण्यात आले होते. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर शहांनी पुन्हा एनआयए आणि ईडीच्या अधिका-यांसोबत एक उच्चस्तरीय बैठक घेऊन कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार आज देशभरात छापे टाकण्यात आले.

मराठवाड्यातून १२ जणांना अटक
दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्याप्रकरणी एटीएस आणि एनआयएकडून देशातील वेगवेगळया भागात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यालयावर छापेमारी करण्यात आली. ज्यात मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना आणि नांदेड, परभणी, बीड जिल्ह्यात कारवाई करण्यात आली. या जिल्ह्यांतून १२ जणांना अटक करण्यात आली. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

औरंगाबाद विभागातून
पाच जणांना अटक
एटीएस आणि एनआयएकडून आज पहाटे राज्यातील अनेक भागात छापेमारी करण्यात आली. यात औरंगाबाद, जालना जिल्ह्यातील ५ जणांना एटीएसने अटक केली. त्यात औरंगाबाद येथून चार आणि जालना जिल्ह्यातून एक असे पाच जणांना अटक केली आहे. ज्यात औरंगाबादच्या नॅशनल कॉलनीतून सय्यद फैसल, बायजीपुरा भागातून पॉप्युलर फ्रंटचा माजी जिल्हाध्यक्ष शेख इरफान, नासिर नदवी आणि परवेज खान याला बायजीपुरा येथून ताब्यात घेतले, तर जालना येथील रहमान गंज भागातील अब्दुल हादी अब्दुल रौफ याला ताब्यात घेण्यात आले.

नांदेड विभागातील ५ जणांना कोठडी
नांदेड: एटीएस पथकाने नांदेडमधून बुधवारी रात्री एकाला ताब्यात घेतले होते, तर इतर चार जणांना परभणी येथून ताब्यात घेतले होते. या पाच जणांना न्यायालयात हजर केले असता मुख्य न्यायदंडाधिकारी किर्ती जैन देसरडा यांनी ३० सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. नांदेडच्या एटीएस पथकाने एनआयएच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी रात्री नांदेडमधून एकास ताब्यात घेतले होते. तसेच परभणीतील चौघांनाही येथे आणले. न्यायालयात हजर केलेल्या आरोपीत मो. मेहराजोद्दीन अब्दुल हई अन्सारी (४२) रा.हैदरबाग नांदेड, अब्दुल सलाम अब्दुल कयुम (३४) रा. परभणी, मोहम्मद निसार मोहम्मद अब्दुल रशीद (४१) रा. परभणी, मोहम्मद जावेद मोहम्मद शब्बीर अन्सारी (३५) रा. परभणी, मोहम्मद अब्दुल करीम अब्दुल हलीम (३७) रा. परभणी यांचा समावेश आहे. एटीएस पथकाला नांदेडमधून हवा असलेला एक मोहम्म आबेद अली महेबूब अली सापडला नाही. पकडलेले पाचही जण पीएफआयचे सदस्य आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या