नवी दिल्ली : उदयनिधी स्टॅलिन यांनी एक वादग्रस्त विधान केले आहे. भाजपा नेत्यांबाबत त्यांनी केलेल्या विधानामुळे आता नवा वाद निर्माण झाला आहे. उदयनिधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे. यासोबतच गंभीर आरोप देखील केला आहे. पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या छळामुळे आणि दबावामुळेच भाजपा नेते अरुण जेटली आणि सुषमा स्वराज यांचा मृत्यू झाला असे उदयनिधी स्टॅलिन यांनी म्हटले आहे़ तसेच पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना बाजूला सारत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. याच दरम्यान स्टॅलिन यांच्या वादग्रस्त विधानावर सुषमा स्वराज आणि अरुण जेटली यांच्या मुलींनी आता उत्तर दिले आहे.
नरेंद्र मोदींवर उदयनिधी स्टॅलिन यांनी केलेल्या गंभीर आरोपांना सुषमा स्वराज यांची मुलगी बांसुरी स्वराज यांनी उत्तर दिले आहे. उदयनिधी यांनी आपल्या आईच्या नावाचा वापर निवडणुकीसाठी करू नये, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच अरुण जेटली यांची मुलगी सोनाली जेटली यांनीही ट्विटरच्या माध्यमातून उदयनिधी यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. उदयनिधीजी कृपया माझ्या आईच्या आठवणींचा वापर तुमच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी करु नका. तुमचे विधान चुकीचे आहे. मोदींनी माझ्या आईला नेहमी आदर आणि सन्मान दिला. आमच्या कठीण काळात पंतप्रधान आणि पक्ष आमच्या बाजूने खंबीरपणे उभे राहिले. तुमच्या विधानाने आम्ही दुखावलो आहोत, असे बांसुरी स्वराज यांनी म्हटले आहे.
अरुण जेटली यांची मुलगी सोनाली जेटली यांनीही आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. उदयनिधीजी तुमच्यावर निवडणुकीचा दबाव आहे हे मी समजू शकते. पण तुम्ही माझ्या वडिलांच्या आठवणींचा अनादर करणार असाल तर शांत बसणार नाही. नरेंद्र मोदी आणि अरुण जेटलींमध्ये राजकारणापलीकडचे संबंध होते. ही मैत्री तुम्हाला कळावी अशी प्रार्थना करते असे म्हटले आहे. उदयनिधी स्टॅलिन यांनी सुषमा स्वराज नावाची एक व्यक्ती होती. मोदींनी टाकलेल्या दबावामुळेच त्यांचा मृत्यू झाला. अरुण जेटली नावाचीही एक व्यक्ती होती. मोदींनी केलेल्या छळामुळेच त्यांचा मृत्यू झाला असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडले आहे.
आता लहान मुलांसाठी विशेष ‘बाल आधार’कार्ड