गाझियाबाद : १६ वर्षे जुन्या वाराणसी साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी मोहम्मद वल्लीउल्ला याला गाझियाबाद न्यायालयाने सोमवार दि. ६ जून रोजी एका प्रकरणात फाशी तर दुस-या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावली. बॉम्बस्फोट मालिकेतील दोन प्रकरणांमध्ये जिल्हा न्यायाधीशांनी शनिवारी (ता. ४) दहशतवादी वल्लीउल्लाला दोषी ठरवले होते तर एका प्रकरणात निर्दोष मुक्तता केली होती.
वाराणसीतील संकट मोचन मंदिर संकुलात झालेल्या बॉम्बस्फोटाप्रकरणी वाराणसी बॉम्बस्फोट प्रकरणात दोषी ठरलेल्या दहशतवादी वलीउल्लाला एका हत्येच्या खटल्यात फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या बॉम्बस्फोटात ७ जणांचा मृत्यू झाला होता, तर २६ जण जखमी आणि अपंग झाले होते. त्याचवेळी दशाश्वमेध घाटावर कुकर बॉम्ब टाकून बॉम्बस्फोट घडवून आणल्याप्रकरणी त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
स्फोटात ७ जणांचा झाला होता मृत्यू
आरोपी वल्लीउल्लाला शनिवारी जिल्हा न्यायालयात हजर केले होते. जिल्हा आणि सत्र न्यायाधीश जितेंद्र कुमार सिन्हा यांनी बनारसमधील संकट मोचन मंदिरात झालेल्या स्फोटात वल्लीउल्लाला दोषी ठरवले होते. येथे बॉम्बचा स्फोट होऊन सात जणांचा मृत्यू झाला होता. दशाश्वमेध घाटावर कुकर बॉम्ब सापडले. प्रकरणीही जिल्हा न्यायाधीशांनी वल्लीउल्लाला दोषी ठरवले होते.