एलुरू : आंध्र प्रदेशात एका गूढ आजारामुळे एकाचा मृत्यू आणि ३४० जणांना रुग्णालयात दाखल केले गेले आहे. यापैकी १८० पुरुष आणि १६० महिला आहेत. या रुग्णांमध्ये समान लक्षणं दिसून येत आहेत. मळमळ, आकडी येणे, अस्वस्थ वाटणे आणि बेशुद्ध पडणे ही लक्षणं असल्याची माहिती डॉक्टरांनी दिलीय. हे रुग्ण एलुरू या श रातले आहेत. हा आजार कशामुळे होतोय याचा तपास आरोग्य अधिकारी घेत आहेत. कोरोनाची लागण झालेल्या रुग्णसंख्येत भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर असताना हा अज्ञात आजार समोर आला आहे. गेल्या दोन दिवसांत रुग्णालयात मोठ्या संख्येने दाखल झालेल्या रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचे दिसून येत नाही. या सर्व रुग्णांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री अल्ला काली कृष्णा श्रीनीवास यांनी दिली.
एलुरू येथील सरकारी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ह्लजे लोक आजारी पडले आहेत त्यापैकी विशेषत: लहान मुलांना डोळ्यात जळजळ झाली आणि त्यांनी अचानक उल्टी करण्यास सुरुवात केली. यापैकी काही जण बेशुद्ध पडले तर काहींना अचानक झटका आल्यासारखे वाटले. या आजाराचे कारण शोधण्यासाठी विशेष वैद्यकीय टीम एलुरू येथे पाठवण्यात आल्याची माहिती आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी दिली. ते रुग्णांना आणि त्यांच्या नातवाईंकांना भेटण्याची शक्यता आहे.व्हायरल संसर्ग असल्याचा कोणताही पुरावा रुग्णांच्या रक्तच्या नमुन्यांमध्ये आढळला नाही अशी माहिती आरोग्यमंत्री श्रीनीवास यांनी दिली.