नवी दिल्ली : अग्निपथ योजनेसंदर्भात तिन्ही दलांच्या प्रमुखांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. ही एक महत्त्वाची बैठक मानली जात आहे. यापूर्वी तिन्ही दलांच्या प्रमुखांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची अनेकदा भेट घेतली आहे. अग्निपथ योजनेला तरुणांचा विरोध पाहता सरकारने अनेक महत्त्वाच्या सवलतीही जाहीर केल्या आहेत. तरुणांव्यतिरिक्त अनेक राजकीय पक्षांच्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांसोबतची ही भेट झाली आहे. मात्र, विरोध होत असतानाही सरकार या योजनेचा सातत्याने बचाव करीत आहे.
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनीही एका मुलाखतीत या योजनेचे फायदे सांगितले आहेत. ही योजना मागे घेतली जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. देशात निदर्शने सुरू असताना सरकारने अग्निपथ योजनेअंतर्गत अग्निवीरांच्या भरतीसाठी अनेक सवलती जाहीर केल्या आहेत. त्यात वयोमर्यादेत शिथिलता देखील समाविष्ट आहे. याशिवाय निमलष्करी दलात अग्निवीरांसाठी अतिरिक्त कोटा ठेवण्याचे आश्वासनही देण्यात आले आहे. महिंद्रा ग्रुपसह अनेक व्यावसायिक संस्थांनी अग्निवीरांना प्राधान्य देणार असल्याचे सांगितले आहे. विशेष म्हणजे तरुणांना चार वर्षे सैन्यात काम करण्याची संधी देणा-या अग्निपथ योजनेवर उत्तर प्रदेश, बिहार, पंजाबसह अनेक राज्यांमध्ये हिंसाचार पाहायला मिळत आहे.