बंगळुरू : रस्त्यावरून रुग्णवाहिका जात असताना रुग्णवाहिकेला रस्ता करून देणे सर्वांचीच जबाबदारी असते. अनेकदा रुग्ण अत्यवस्थ असतात. त्यामुळे चालकांना रुग्णवाहिका वेगाने चालवावी लागते. मात्र वेगामुळे अनेकदा अपघातांची शक्यता निर्माण होते. दुर्दैवाने कर्नाटकमध्ये रुग्णांना घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेचा भीषण अपघात झाल्याचं समोर आलं आहे.
बयंदूरजवळील टोलनाक्यावर एक वेगवान रुग्णवाहिका धडकल्याचा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये रुग्णवाहिका येतेय हे दिसताच टोलनाक्यावरील कर्मचारी बॅरिकेडस दूर करण्यासाठी धावतात. त्याचवेळी वेगाने येणारी रुग्णवाहिका टोलनाक्यावर येऊन धडकते. या जोरदार धडकेत टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांसह चार जण जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे.
अपघातग्रस्त रुग्णवाहिका रुग्णाला होन्नावरा येथे घेऊन जात होती. रुग्णवाहिका टोलनाक्यावर आली असताना तिथं गाय बसलेली होती. गाय असल्यामुळे चालकाने वेगवान रुग्णवाहिका थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेच कदाचित रुग्णवाहिकेने टोलनाक्याला धडक दिल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. जखमींना रुग्णालयात दाखल कऱण्यात आलं आहे.