20.8 C
Latur
Thursday, October 21, 2021
Homeराष्ट्रीयपर्यावरणाला प्लास्टिकचा सर्वाधिक धोका!

पर्यावरणाला प्लास्टिकचा सर्वाधिक धोका!

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : जगभरात प्लास्टिकची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. एवढेच नव्हे, तर पर्यावरणाला सर्वाधिक धोका प्लास्टिकचाच असल्याचे अभ्यासातून समोर आले आहे. एकीकडे प्लास्टिक बंदीची मागणी जोर धरत आहे, तर दुसरीकडे याचा सीमित वापर करण्याचीही चर्चा होते. भारतातदेखील ही मागणी सातत्याने पुढे येते. मात्र, कसोसीने प्रयत्न करूनही अद्याप प्लास्टिकवर बंदी घालण्यात किंवा वापर कमी करण्यात यश आलेले नाही. आकडेवारीचा विचार केल्यास भारतात १९९० मध्ये प्लास्टिकचा वापर किमान २० हजार टन होता. मात्र, गेल्या दीड दशकात हा वापर तब्बल ३ लाख टनांवर गेला आहे. त्यामुळे प्लास्टिकचा वापर किती पटीने वाढला, याचा अंदाज येतो.

२०१७ मध्ये राष्ट्रीय हरित लवादाने एक महत्त्वपूर्ण निर्णय सुनावत ५० मायक्रोनपेक्षा जाडीच्या नॉन बायोडिग्रेटेबल प्लास्टिकच्या पिशव्या वापरास तात्काळ बंदी घालण्याचा आदेश दिला होता. एवढेच नव्हे, तर एक आठवड्याच्या आत प्लास्टिकचे सर्व स्टॉक जप्त करण्यास सांगितले होते. एवढेच नव्हे, तर दिल्लीत एखाद्या व्यक्तीजवळ प्रतिबंध घातलेले प्लास्टिक सापडले, तर त्याच्या विरोधात पर्यावरणाचे नुकसान करण्यास जबाबदार धरून ५ हजारांचा दंड ठोठावावा, असे आदेशात म्हटले होते. मात्र, दिल्लीत प्लास्टिक वापरावर पूर्णत: बंदी घालता आली नाही. अजूनही सर्रास प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर होतो. दरम्यान, आता भारताने जुलै २०२२ पासून सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

देशातील किमान २० पेक्षा अधिक राज्यांत आणि केंद्रशासित प्रदेशांत प्लास्टिकवर बंदी घालणारे अशाच प्रकारचे नियम लागू आहेत. मात्र, नियम लागू करून आणि प्रतिबंध घालूनही दिल्लीसह या सर्वच राज्यांत प्लास्टिकचा सर्रास वापर सुरू आहे. प्लास्टिक पिशव्या किंवा एकूणच प्लास्टिकचा वापर कमी होण्याऐवजी तो वाढतच असेल, तर याचाच अर्थ उत्पादन, विक्री आणि उपयोगासंदर्भात संबंधित विभागाची भूमिका बेजबाबदार किंवा निष्काळजीपणाची आहे, हे यातून स्पष्ट होते. मग केवळ नियमच लागू असतील आणि प्लास्टिकचा सर्रास वापर होत असेल, तर मग नियम लागू करून उपयोग काय, असा प्रश्नही उपस्थित होतो.
नागरिकांच्या थोड्याशा बेजबाबदारपणामुळे आणि कचरा नियमन प्रणालीच्या हलगर्जीमुळे पॉलिथिन किंवा अन्य प्रकारचे प्लास्टिक नाल्यांमध्ये फसताना दिसत आहे. त्यामुळे गटारी तुंबण्याचे प्रमाण अधिक आहे. हे प्लास्टिक नाल्यांसोबत ड्रेनेज, सीवरेज यंत्रणाही ठप्प करते. एवढेच नव्हे, तर नद्यांमधूनही प्लास्टिक कचरा वाहताना दिसतो. त्यामुळे थोडाही पाऊस झाला की, जागोजागी पुराची स्थिती उद्भवत आहे. यातून मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तसेच पर्यावरणाचीही हानी होत आहे.

आयरलँडमध्ये वापर केल्यास ९० टक्के टॅक्स
प्लास्टिक कच-याला आळा घालण्यासाठी काही देशांनी कठोर पावले उचलायला सुरुवात केली आहे. आयरलँडमध्ये प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणा-या व्यक्तीला ९० टक्के टॅक्स लावला जातो. या टॅक्सच्या भीतीने आता तेथील प्लास्टिकचा वापर आपोआप कमी होण्यास मदत झाली आहे.

आस्ट्रेलियातही प्लास्टिक वापरात ९० टक्के घट
ऑस्ट्रेलियातही सरकारने जनतेला प्लास्टिक न वापरण्याचे आवाहन केले. तसेच प्लास्टिक वापराचे तोटेही समजावून सांगितले. त्यामुळे तेथे प्लास्टिकच्या वापरात ९० टक्के घट झाली आहे. आफ्रिकेतील रवांडा येथेही प्लास्टिक बंदी असून, तेथे प्लास्टिक बॅग तयार करणे, खरेदी आणि वापरावर दंड आकारला गेला आहे.

अमेरिकेत बंदी
अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये रिसायकल न होणा-या प्लास्टिकवर बंदी आहे. फ्रान्समध्येही २००२ मध्ये प्लास्टिकवर बंदीचे अभियान सुरू करण्यात आले. त्यानंतर २०१० मध्ये संपूर्ण देशात प्लास्टिक बंदी लागू करण्यात आली. त्यामुळे तेथेही प्लास्टिकचा वापर कमी झाला आहे. याशिवाय चीन, मलेशिया, व्हिएतनाम, थायलंड, इटली आदी देशांतही प्लास्टिक कच-यावर बंदी घातली आहे. चीनमध्ये जगात सर्वाधिक प्लास्टिक कचरा तयार होतो. मात्र, त्यांनीही आता ठोस पावले उचलली आहेत.

 

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या