गांधीनगर : गुजरात विधानसभा निवडणुकीतील दुस-या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा आज थंडावल्या. गुजरातमध्ये पहिल्या टप्प्यातील ८९ जागांसाठी १ डिसेंबरला मतदान पार पडले. आज दुस-या टप्प्यातील ९३ जागांसाठी प्रचाराची मुदत संपली. पहिल्या टप्प्यात ग्रामीण भागात मतदान पार पडले होते. मात्र, पहिल्या टप्प्यात मतदानाची टक्केवारी घटल्याने राजकीय पक्षांची डोकेदुखी वाढली होती.
दुस-या टप्प्यात १४ जिल्ह्यांमधील ९३ मतदारसंघातील २ कोटी ५१ लाख मतदार मतदान करणार आहेत. ९३ जागांसाठी ८३३ उमेदवार रिंगणात आहेत. ८३३ पैकी २८५ अपक्ष उमेदवार आहेत, तर ६९ महिला निवडणुकीच्या रिंगणात आहेत. भाजप सर्व ९३ जागा लढत असून काँग्रेसने ३ जागा राष्ट्रवादी काँग्रेसला दिल्या आहेत. गुजरात विधानसभेची सदस्यसंख्या १८२ आहे.