गोवा : कोविडचे रुग्ण आणि कोविड मुळे मृत्यू झालेल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने शाळा पुन्हा सुरू करण्याबाबतचा निर्णय त्यावेळची परिस्थिती पाहुन २ ऑक्टोबर नंतरच घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज स्पष्ट केले. कोविडचे रुग्ण वाढत असल्याने २१ सप्टेंबर पासून शाळा सुरु करणे धोक्याचे ठरेल अशी भीती पालकांकडून व्यक्त केली जात होती. अनलॉक-४ मध्ये नमूद केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, इयत्ता दहावी व बारावीचे विद्यार्थी, स्वेच्छेने शाळेत जाऊन, आपल्या अडचणींचे निराकरण शिक्षकांकडून करून घेऊ शकतात,असे मुख्यमंत्री म्हणाले.
मुख्यमंत्र्यांतर्फे आज, नवीन शैक्षणिक धोरण, २०२o वर चर्चा करण्यासाठी आणि शाळा पुन्हा सुरू करण्याबाबतचा निर्णय घेण्यासाठी, शिक्षण तज्ज्ञ आणि भागधारक याच्यांसह आभासी बैठक घेण्यात आली. या बैठकीला, शिक्षण सचिव, नीला मोहनन, शिक्षण संचालक संतोष आमोणकर, नवीन शैक्षणिक धोरण २०२o च्या अंमलबजावणीसाठी कृती दल समितीचे अध्यक्ष तथा शिरोडाचे आमदार, सुभाष शिरोडकर, सर्व तालुक्यांचे एडीईआय व संबंधित संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
शाळा पुन्हा सुरू करण्याबाबतचा निर्णय, विशेषत: इयत्ता दहावी आणि बारावी, तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार व या महामारीच्या परिस्थितीचा विचार करुन २ ऑक्टोबर नंतरच घेण्यात येईल. इंटरनेट कनेक्टिव्हिटी ही गावातील विद्यार्थ्यांसाठी अजूनही एक समस्या आहे, सरकारतर्फे यावर लवकरच उपाय काढला जाईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
भागधारकांनी व प्रतिनिधींनी नवीन शैक्षणिक धोरणाचा अभ्यास करावा आणि आपल्या सूचना या, गठीत केलेल्या कृती दल समित्यांकडे द्याव्यात, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले. ‘प्रत्येक शिक्षक, मुख्याध्यापक आणि पीटीए सदस्याने, या धोरणाचा अभ्यास करावा व त्यांनी आपल्या बहुमोल सूचना कृती दल समित्यांना द्याव्यात,’ असे मुख्यमंत्री म्हणाले.
जिल्ह्यात पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम