नवी दिल्ली : भारतीय रेल्वेच्या दक्षिण विभागाने भारत गौरव योजनेंतर्गत धावणा-या पहिल्या खासगी रेल्वे सेवेला हिरवा झेंडा दाखवला. कोईम्बतूर ते शिर्डी या मार्गावर भारत गौरव योजनेच्या अंतर्गत भारतातील पहिली खासगी रेल्वे धावली. भारत गौरव योजनेच्या पहिल्या खासगी ट्रेनचा प्रवास १४ जून रोजी सायंकाळी ६ वाजता उत्तर कोईम्बतूर येथून चालू झाला होता आणि १६ जून रोजी सकाळी साडेसात वाजता ही ट्रेन साईनगर शिर्डी येथे पोहोचली, असे रेल्वे मंत्रालयाने सांगितले.
भारताच्या रेल्वे मंत्रालयाने नोव्हेंबरमध्ये भारत गौरव योजना जाहीर केली होती. या योजनेतून खासगी कंत्राटदारांना रेल्वे भाड्याने घेता येणार आहे. याच योजनेंतर्गत साऊथ स्टार रेल यांनी भारत गौरवची पहिली रेल्वे चालवली. दरम्यान, साउथ स्टार रेल ही भारत गौरव ट्रेन चालवणारी पहिली नोंदणीकृत कंपनी ठरली आहे. भारत गौरव योजनेच्या अंतर्गत सेवा देण्यासाठी या खासगी कंपनीने २० डब्याच्या गाडीसाठी दक्षिण रेल्वेला सुरक्षा ठेव म्हणून १ कोटी रुपये दिले आहेत. त्याशिवाय वार्षिक दर म्हणून २७.७९ आणि स्थिर दर म्हणून ७६.७७ लाख रूपये दक्षिण रेल्वेला दिले आहेत.
दरम्यान सध्याच्या एका फेरीसाठी ३८.२२ लाख रुपयांची रक्कम कंपनीने जमा केली असल्याचे रेल्वे मंत्रालयाने सांगितले. दरम्यान ट्रेन चालवण्यासाठी रेल्वे विभाग कर्मचारी, गार्ड आणि डब्यांसाठी बोर्डवरील देखभाल करणारे कर्मचारी प्रदान करेल. तसेच हाउसकीपिंग आणि केटरिंग व्यवस्था ज्या त्या खासगी कंपन्याकडून राबवण्यात येणार असल्याचे मंत्रालयाने सांगितले आहे. सर्व डब्यांमध्ये भक्तिगीते आणि गाणे वाजवण्यासाठी सेवा सुरू करण्यात आली आहे.
आता रेल्वेही भाड्याने घेता येणार
भारत गौरव योजनेनुसार कोणत्याही कंत्राटदाराला किंवा व्यक्तीला भारतीय रेल्वे भाड्याने घेता येणार आहेत. पर्यटन पॅकेज किंवा इतर सेवेसाठी भारतीय रेल्वेकडून किमान २ वर्षासाठी भाड्याने घेता येणार आहे. दरम्यान सेवा देणा-या खासगी कंपनीला मार्ग, थांबे, प्रदान केलेल्या सेवा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे दर ठरवण्याचे स्वातंत्र्य असल्याचे मंत्रालयाने सांगितले.
रेल्वेत एक फर्स्ट एसी कोच
या योजनेमधील गाड्यांना एक फर्स्ट एसी कोच, तीन २ टायर एसी कोच आणि आठ ३-टायर कोच आणि पाच स्लीपर क्लास कोच आहेत. दरम्यान रेल्वे पोलिस दलासह खाजगी सुरक्षेसह कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत उपस्थित राहण्यासाठी एक डॉक्टरदेखील असणार आहे.
३ हजार डबे उपलब्ध करून देणार
भारत गौरव योजने अंतर्गत भारतीय रेल्वे मंत्रालयाने ३ हजार ३३ डबे निर्धारित केले आहेत. ते भाड्याने घेण्यासाठी कोणीही रेल्वेशी संपर्क करू शकतो. दरम्यान, खासगी कंत्राटदाराला परवडत असेल तर तो भारतीय रेल्वे उत्पादन युनिट्सकडून रेक खरेदी करून ते चालवू शकणार आहे.