बंगळुरू : आरएसएसचा झेंडा एक दिवस राष्ट्रध्वज बनेल, असे विधान कर्नाटकचे माजी मंत्री आणि ज्येष्ठ भाजपा नेते के. एस. ईश्वरप्पा यांनी केले आहे. त्यांच्या या विधानामुळे आता मोठा वाद उफाळून येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
याआधीही ईश्वरप्पा यांनी वादग्रस्त विधान केले होते. के. एस. ईश्वरप्पा म्हणाले की, भगव्या ध्वजाकडे आदराने पाहिले जाते. हजारो वर्षे भगव्या झेंड्याचा आदर केला गेला आहे. भगवा ध्वज त्यागाचे प्रतीक आहे.
आरएसएसचा झेंडा एक दिवस राष्ट्रीय ध्वज बनेल यात शंका नाही. त्यागाची भावना जपण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भगवा झेंडा समोर ठेवून पूजा करते. संविधानानुसार तिरंगा राष्ट्रध्वज आहे, तिरंग्याला जो मान द्यायला हवा, तो आम्ही देतो.
अशाच प्रकारचे विधान ईश्वरप्पा यांनी याआधीही केले होते. ते म्हणाले होते की, भगवा झेंडा भविष्यात राष्ट्रीय ध्वज बनू शकतो. सध्या तिरंगा राष्ट्रीय ध्वज आहे आणि त्याचा सर्वांनीच सन्मान केला पाहिजे. अनेक वर्षांपूर्वी भगवान राम आणि मारुतीच्या रथांवर भगवे झेंडे होते. तेव्हा आपला तिरंगा होता का? पण आता तो आपला राष्ट्रीय ध्वज आहे, त्यामुळे आपल्याला त्याचा मान राखला पाहिजे.