नवी दिल्ली : केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र तोमर यांनी शेतकरी आंदोलन न संपण्यामागील कारण सांगताना धक्कादायक दावा केला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून दिल्लीतील सीमेवर सुरु असलेले शेतकरी आंदोलन संपू नये असे काही अदृश्य शक्तींना वाटत आहे, असा आरोपच त्यांनी केला आहे. तोमर यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना हा दावा केला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून शेतक-यांचे आंदोलन मिटविण्यासाठी व समाधानकारक तोडगा काढण्यासाठी सरकार व शेतक-यांमध्ये चर्चेच्या तब्बल ११ फे-या पार पडल्या. मात्र तरीही तोडगा निघत नसल्याचे चित्र आहे. तोडगा न निघण्यामागे शेतकरी आंदोलनामागे असलेली अदृश्य शक्ती हेच कारण आहे, असा दावा तोमर यांनी केला आहे.
आपल्या दाव्याचे स्पष्टीकरण करताना तोमर यांनी शेतक-यांच्या भुमिकेवरही टीका केली. शेतकरी संघटना केवळ कृषि कायदे रद्दच करा,यामागणीवर अडून बसले आहेत. कायद्यांचे फायदे जाणून घेण्याची त्यांची तयारीच दिसत नाही,असे दिसून येत असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपकडून वारंवार आक्रस्ताळे आरोप केंद्रातील भाजपप्रणित रालोआ सरकारला गेल्या २ महिन्यांपासून चालू असलेले शेतकरी आंदोलन मिटवण्याबाबत अपयश आलेले आहे. दरम्यानच्या काळात भाजप अनेक नेत्यांकडून अनेकवेळा आक्रस्ताळी भुमिका घेतली गेली आहे. शेतकरी आंदोलनामागे खलिस्तानसमर्थक दहशतवादी, पाकिस्तान व चीन असल्याचा आरोप भाजपच्या नेत्यांकडून वारंवार करण्यात आलेला आहे. त्यावरुन सातत्याने सरकारवर टीकाही केली गेली आहे. मात्र आता खुद्द केंद्रीय कृषिमंत्र्यांनीच असे विधान केल्याने सरकारच्या भुमिकेविषयीच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
यंदाच्या बजेट सादरीकरणात अनेक बदल