नवी दिल्ली : भारतात पुन्हा एकदा कोरोनाच्या नवीन रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसून येत असून, गेल्या २४ तासांत देशात कोरोनाचे ८,३२९ नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. ७ जून रोजी देशात दैनंदिन रुग्णांची संख्या पाच हजारांच्या पुढे होती, आता ही संख्या ८ हजारांच्या पुढे गेली आहे. त्यामुळे प्रशासनासह नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. सध्या देशातील सक्रीय रुग्णांची संख्या ४० हजारांवर पोहोचली आहे.
दिवसागणिक वाढत जाणा-या आकडेवारीनंतर देशातील कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या आता ४०,३७० वर पोहोचली असून, गेल्या २४ तासांत १० जणांचा मृत्यू झाला. उपचाराधीन रुग्णांची संख्या संसर्गाच्या एकूण प्रकरणांपैकी ०.०९ टक्के आहे, तर कोविड-१९ मधून बरे होण्याचा राष्ट्रीय दर ९८.६९ टक्क्यांवर नोंदवण्यात आला आहे. देशातील कोरोना संसर्गाचा दैनंदिन दर २.४१ टक्के आणि साप्ताहिक संसर्ग दर १.७५ टक्के इतका नोंदवला गेला आहे.
गेल्या आठवडाभरापासून महाराष्ट्रात नव्या कोरोना बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून, गेल्या २४ तासांत राज्यात ३,०८१ नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली आहे, तर १३२३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दिलासादायक बाब म्हणजे आज राज्यात शून्य मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सध्या राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या १३,३२९ इतकी नोंदवण्यात आली आहे.