अमित शहा यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघात
पुणे : विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शाह शनिवारी पुणे दौ-यावर होते. रात्री मोदी @ २० पुस्तकाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधत मुख्यमंत्रिपदासाठी त्यांनी विरोधी पक्षांचे तळवे चाटले, अशी जहरी टीका केली.
यावेळी अमित शहा यांनी निवडणूक आयोगाच्या कालच्या निकालावर भाष्य केले. निवडणूक आयोगाने शिवसेनेचे पक्षचिन्ह आणि नाव एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिले. निवडणूक आयोगाने दूध का दूध आणि पाणी का पाणी केले आहे. त्यामुळे आता राज्यातील सर्व लोकसभेच्या जागा जिंकण्याचा आपल्याला निर्धार करायचा आहे. मोदी @२० हे मोदीजींच्या जीवनावर आधारित नसून, भाजपची यशोगाथाही नाही. पण हे पुस्तक भारतातील समस्यांचे निराकरण आहे, असे अमित शहा म्हणाले. एक व्यक्ती सगळ््या गोष्टी त्यागून पक्षासाठी आपले सर्वस्व देतो तसेच गरिबांचे समस्या शोधतो आणि त्याचे निरसन करतो, ही मोठी गोष्ट आहे, असे अमित शहा म्हणाले.
निवडणूक आयोगाच्या निर्णयावर बोलताना त्यांनी काल एक निर्णय झाला आणि एकनाथ शिंदे यांना धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव मिळाले. मागच्या वेळी आम्ही निवडणूक एकत्र लढलो. पण मुख्यमंत्रीपदासाठी त्यांनी विरोधी पक्षांचे तळवे चाटले, असा घणाघात अमित शाह यांनी ठाकरेंवर केला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेना भाजप युती म्हणून लढेल, जे धोका देतात त्यांना कधी क्षमा करायला नको, असे अपिल मी कार्यकर्त्यांना करायला आलो आहे, असे अमित शाह म्हणाले. आम्ही विचारांशी बांधील आहोत, सत्ता मिळवण्यासाठी वडिलांचे विचार सोडणारे नाहीत, असा टोला शाहांनी उद्धव ठाकरेंना लगावला.