19.2 C
Latur
Sunday, January 23, 2022
Homeराष्ट्रीयसंसद अधिवेशनालाही कोरोना संसर्गाने ग्रासले

संसद अधिवेशनालाही कोरोना संसर्गाने ग्रासले

३० खासदारांना कोरोना,५० कर्मचारीही बाधित

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : आजपासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली. परंतु यापूर्वीच लोकसभेचे १७ खासदार कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याचे समोर आले होते. त्यात आणखी भर पडली असून, संसदेचे एकूण ३० खासदार पॉझिटिव्ह आढळल्याचे समोर आले असून, ५० कर्मचारीही बाधित झाले आहेत. संसदेचे अधिवेशन १५ दिवस चालणार आहे. त्यामुळे सदस्यांची चिंता वाढली आहे.

खबरदारीचा उपाय म्हणून संसद भवनात या सर्व खासदारांची १३ आणि १४ सप्टेंबर रोजी कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यात सोमवारी सकाळपर्यंत ३० खासदार कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. या कोरोना संक्रमित खासदारांमध्ये सर्वाधिक खासदार सत्ताधारी भाजपचे आहेत, तसेच शिवसेनेच्या चार खासदारांना कोरोना झाला आहे. याशिवाय वायएसआर काँग्रेस, डीएमके, राष्ट्रीय जनता दलासह इतर पक्षांच्या खासदारांचा समावेश आहे. त्यांना विलगीकरणात राहण्यास सांगण्यात आले आहे.

अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी ३५९ सदस्यांनी लोकसभेच्या कामकाजाला हजेरी लावल्याचे सांगण्यात आले.पावसाळी अधिवेशनाला सुरूवात होण्यापूर्वीच सर्व खासदार आणि कर्मचारी आपली कोविड चाचणी करतील, असा नियम बनवण्यात आला होता. कोविड चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतरच त्यांना संसद परिसरात प्रवेशाची परवानगी देण्यात आली. कोरोना चाचणीचा अहवाल हा ७२ तासांहून अधिक वेळापूर्वीचा नसावा, असाही नियम आहे. खासदारांना हजेरी लावण्याची पद्धतही बदलण्यात आली आहे. आता खासदारांना अटेन्डन्स रजिस्टर अ‍ॅपद्वारे आपली उपस्थिती नोंदविता येणार आहे. लोकसभेत खासदारांच्या बाकड्यावर काचेची शिल्ड लावून सुरक्षा प्रदान करण्यात आली. बहुतेक खासदार आपल्या जागेवर बसूनच आपले म्हणणे मांडत आहेत.

संसदेत सोशल डिस्टन्स
अधिवेशनादरम्यान फिजिकल डिस्टन्सिंग पाळणे महत्त्वाचे असल्याने राज्यसभा चेंबर, गॅलरी, लोकसभा चेंबर येथे खासदारांना बसण्याची सोय करण्यात आली. सभागृहाचे कामकाज, सदस्यांचे भाषण ऐकता यावे, यासाठी दोन्ही सभागृहांच्या गॅलरीत स्क्रीन लावण्यात आले आहेत.

मीनाक्षी लेखी, चिखलीकरांचा समावेश
खासदार मीनाक्षी लेखी, अनंत कुमार हेगडे आणि प्रवेश साहिबसिंह वर्मा यांच्यासह एकूण ३० खासदार कोरोना पॉझिटिव्ह आढळले. यामध्ये सुखबीर सिंह, प्रतापराव जाधव, जनार्दन सिंह, हनुमान बेनीवाल, सेल्वम जी, प्रताप पाटील चिखलीकर, रामशंकर कठेरिया,सत्यपाल सिंह यांचाही समावेश आहे.

चीनच्या प्रश्नावर कॉंग्रेसचा स्थगन प्रस्ताव
लोकसभेचे कामकाज मंगळवारी दुपारी ३ वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले. त्यानंतर दुपारी ३ वाजल्यापासून राज्यसभेचे कामकाज सुरू झाले. तत्पूर्वी लोकसभेत विरोधकांनी सरकारच्या कामकाजावर काही प्रश्न उपस्थित केले. त्यानंतर तुमचे म्हणणे ऐकून घेतले जाईल, असे आश्वासन लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दिले. दरम्यान, पूर्व लडाखमध्ये चीनने केलेल्या अतिक्रमणावर चर्चा करण्यासंदर्भात काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी आणि के. सुरेश यांनी लोकसभेत स्थगन प्रस्तावाची नोटीस दिली. वेगवेळया पक्षाच्या खासदारांनी वेगवेगळया मुद्यांवर चर्चेसाठी नोटिसा दिल्या आहेत.

बाधितांची संख्या वाढता वाढे…!

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या