28.3 C
Latur
Friday, June 25, 2021
Homeराष्ट्रीयडीआरडीओच्या नव्या औषधाने रुग्ण लवकर बरे होणार

डीआरडीओच्या नव्या औषधाने रुग्ण लवकर बरे होणार

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : डीआरडीओकडून मान्यता मिळालेले २ डायोक्सी डी ग्लुकोज हे कोरोना प्रतिबंधक औषध पूर्णपणे सुरक्षित असून, त्यामुळे रुग्ण लवकर बरे होण्यास मदत होते, असे मत वैज्ञानिक डॉ. सुधीर चंदना यांनी आज व्यक्त केले आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या इन्स्टिट्यूट ऑफ न्युक्लिअर मेडिसीन अँड अलाईड सायन्सेस या प्रयोगशाळेने हैदराबादच्या डॉ. रेड्डीज प्रयोगशाळेच्या संयुक्त विद्यमाने हे औषध तयार करण्यात आले आहे. डॉ. चंदना हे याच प्रयोगशाळेत काम करणारे वैज्ञानिक आहेत.

हे औषध कोरोना रुग्ण बरे होण्यामध्ये परिणामकारक ठरत असल्याचे या औषधाच्या वैद्यकीय चाचण्यांमधून समोर आले आहे. चाचण्यांच्या दुस-या टप्प्यात ११० रुग्णांवर या औषधाचा प्रयोग करण्यात आला, तर तिस-या टप्प्यात २२० रुग्णांवर हा प्रयोग करण्यात आला. नेहमीच्या कोरोना उपचारांपेक्षा हे औषध वापरुन केलेले उपचार अधिक परिणामकारक असल्याचे समोर आल्याची माहिती डॉ. चंदना यांनी दिली आहे. ते म्हणाले, या औषधामुळे आत्ताच्या साधारण कालावधीच्या २ ते ३ दिवस आधीच कोरोना रुग्ण बरा होत आहे.

त्याचप्रमाणे तिस-या टप्प्यात तिस-या दिवशी ४२ टक्के रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासली नाही. तर साधारण परिस्थितीत तिस-या दिवशी ३१ टक्के रुग्ण ऑक्सिजनमुक्त होतात. साधारण उपचारांसोबत हे औषध वापरल्यास रुग्णाची ऑक्सिजनची गरज कमी होत असल्याचे समोर आले आहे. गेल्या वर्षीच्या एप्रिलपासूनच या औषधाच्या चाचण्या सुरु करण्यात आल्या होत्या. मे २०२० ते ऑक्टोबर २०२० या कालावधीत दुस-या टप्प्यातल्या चाचण्या करण्यात आल्या.

यात ११० रुग्णांवर या औषधाचा प्रयोग करण्यात आला. या चाचण्यांमधून समोर आलेल्या परिणामांनंतर पुढच्या टप्प्यातली चाचणी डिसेंबर २०२० ते मार्च २०२१ या कालावधीत करण्यात आली. या चाचणीसाठी २२० रुग्णांवर प्रयोग करण्यात आला. कालच या भुकटी स्वरूपातल्या कोरोनावरच्या औषधाला भारताच्या औषध महानियंत्रकांची तातडीच्या वापरासाठी मंजुरी दिली आहे. हे औषध पाण्यातून मिसळून घेता असल्याचेही समोर आले आहे.

निलंगा तालुक्यात वीज पडून दोघे ठार, सात जनावरे दगावली

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
202FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या