पाटणा : २०४७ पर्यंत भारताला इस्लामिक राष्ट्र बनवण्याच्या मोहिमेसाठी केरळ आणि इतर अनेक राज्यांतील तरुणांना प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाचा पर्दाफाश करून सुरक्षा दलांनी फुलवारी शरीफ, बिहारची राजधानी पाटणा इथून दोन आरोपींना अटक केली आहे. त्यांचा दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग असल्याचा संशय आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाटणा दौ-याच्या एक दिवस आधी सोमवारी रात्री ही कारवाई करण्यात आली आहे.
मार्शल आर्टस् आणि फिजिकल ट्रेनिंग देण्याच्या नावाखाली पाटण्यात एक अतिशय धोकादायक खेळ सुरू होता. पाकिस्तान, बांगलादेशसह इतर देशांशीही त्याचे संबंध असल्याचे पुरावे मिळाले आहेत. सुरक्षा यंत्रणांना या लोकांची माहिती होती. आयबी, दिल्लीकडून माहिती मिळाल्यानंतर एएसपी मनीष यांच्या नेतृत्वाखाली चार पोलिस ठाण्यांच्या पोलिसांनी सोमवारी रात्री उशिरा छापे टाकले.
शरीफ नया टोला येथील एसडीआयपी (सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया) आणि पीएफआय यांच्या कार्यालयांवर छापे टाकण्यात आले. कारवाईदरम्यान जलालुद्दीन खान आणि अतहर परवेझ या दोघांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी अटकेला दुजोरा दिला आहे. पोलिसांनी सांगितले की, जलालुद्दीन हा झारखंडमध्ये इन्स्पेक्टर होता आणि तो निवृत्त झाला आहे.
अतहर जुन्या सदस्यांना एकत्र करून संघटना स्थापन करण्याच्या नावाखाली गुप्तपणे प्रशिक्षण देत होता. यामध्ये शस्त्र वापरण्यापासून ते देशात उन्माद निर्माण करण्यापर्यंतची रणनीती सांगण्यात आली. हे लोक ‘व्हिजन २०४७’ वर काम करत होते, ज्यात भारताला इस्लामिक राष्ट्र बनवण्याच्या मिशनचा एक भाग म्हणून देशात जातीय तणाव निर्माण करण्याच्या प्रयत्नांवर लक्ष केंद्रित केले होते. त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या पुस्तिका, कागदपत्रं आदींवरून याचा पुरावा मिळाला आहे.