नवी दिल्ली : २०२१ च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या सुमारे १ अब्ज ३४ कोटी आहे आणि येत्या २०२७ पर्यंत भारत चीनला मागे टाकत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश होणार असा अंदाज संयुक्त राष्ट्रांनी व्यक्त केला आहे. यामुळे आता लोकसंख्या हे भारतासमोर खूप मोठे आव्हान आहे. त्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत असून लोकसंख्या नियंत्रणासाठी लवकरच कायदा आणण्याच्या तयारीत आहे.
केंद्रीय मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी मंगळवारी याबाबत माहिती दिली. छत्तीसगडमधील रायपूर येथे एका संमेलनादरम्यान ते बोलत होते. मागील कित्येक दिवसांपासून लोकसंख्या नियंत्रणाबाबत कायदा आणण्याची मागणी जोर धरून आहे. यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उडी घेतल्यानंतर आता हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
एका जाहीर सभेला संबोधित करताना राज ठाकरे यांनी केंद्र सरकारला लोकसंख्या नियंत्रण कायदा आणण्याचे आवाहन केले होते. राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही राज ठाकरेंना पाठिंबा दिला होता.
याचाच प्रभाव म्हणावा की काय, आता केंद्र सरकार लवकरच देशात लोकसंख्या नियंत्रण कायदा आणणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी दिली.
संयुक्त राष्ट्रांच्या म्हणण्यानुसार येत्या काळात भारत चीनला मागे टाकून जगातील सर्वांत जास्त लोकसंख्येचा देश बनेल.