नवी दिल्ली : पुढील वर्षी भारतात होणा-या प्रजासत्ताक दिनाला इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने याला दुजोरा दिला.
मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वतीने अब्देल फताह यांना निमंत्रण पाठविण्यात आलं होतं, ते त्यांनी स्वीकारलं आहे. प्रजासत्ताक दिनाला इजिप्तचे राष्ट्रपती प्रमुख पाहुणे म्हणून भारतात येण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे.
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी ऑक्टोबर २०२२ मध्ये इजिप्तच्या दौ-यात राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह यांची भेट घेतली होती. त्यानंतर अब्देल यांना पंतप्रधानांनी प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केलं. परराष्ट्र मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलंय की, भारत आणि इजिप्तमध्ये सखोल संबंध आहेत. दोन्ही देश या वर्षी राजनैतिक संबंधांच्या स्थापनेचा ७५ वा वर्धापन दिन साजरा करत आहेत.