नवी दिल्ली : भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या पश्चिम बंगालचे मंत्री पार्थ चॅटर्जी यांची निकटवर्तीय सहकारी अर्पिता मुखर्जी यांच्या चौथ्या घराची गुरुवारी झडती घेण्यात आली. यापूर्वी अर्पिता मुखर्जीच्या आणखी एका घराच्या झडतीत सुमारे ३० कोटी रुपये रोख सापडले होते. आता ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अर्पिताच्या चार वाहनांचा शोध सुरू आहे.
अर्पिताच्या डायमंड सिटी फ्लॅटच्या घरातून ही वाहने गायब आहेत. यामध्ये AUDI A4 WB02 AB9561, 2. HONDA CITY WB06T6000, 3. HONDA CRV WB06T6001, 4. मर्सिडीज बेंझ WB02AE2232 या चार कारचा समावेश आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्पिताच्या अटकेच्या वेळी फक्त एक पांढऱ्या रंगाची मर्सिडीज कार (पाचवी) जप्त करण्यात आली होती.
दरम्यान गायब असलेल्या चारही कारमध्ये मोठ्या प्रमाणात रोकड होती. या वाहनांच्या शोधात ईडी असून अनेक ठिकाणी छापे टाकण्यात येत आहेत. तसेच अनेक ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज देखील तपासले जात असल्याचे समजते.
तत्पूर्वी ममता बॅनर्जी यांनी पार्थ चॅटर्जी यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी केली आहे. तसेच सर्व पदांवरून हटवले आहे. याबाबतची माहिती अभिषेक बॅनर्जी यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली आहे. यापूर्वी गुरुवारी बंगालचे माजी मंत्री पार्थ चॅटर्जी यांच्या निकटवर्तीयाच्या चौथ्या घराची झडती घेण्यात आली होती. अर्पिता मुखर्जीच्या आणखी एका घराची झडती घेतली असता सुमारे ३० कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली.