22.7 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeराष्ट्रीयमराठीला अभिजात भाषेचा दर्जा, स्वत: लक्ष घालणार : अमित शहा

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, स्वत: लक्ष घालणार : अमित शहा

एकमत ऑनलाईन

दीव : मागील अनेक वर्षांपासून मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा अशी मागणी केली जात आहे. त्यासाठी राज्य सरकारने वेळोवेळी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केलेला आहे. मात्र केंद्राने अद्याप मराठीला अभिजात भाषा म्हणून जाहीर केलेले नाही. असे असताना आज उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी पुन्हा एकदा मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा अशी मागणी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे केली. यावर अमित शाह यांनी मी स्वत: यात लक्ष घालतो, असे आश्वासन दिले आहे.

राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई दीव येथे आयोजित पश्चिम भागातील राज्यांच्या परिषदेत आज सहभागी झाले. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित होते. या बैठकीत मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे अशी मागणी सुभाष देसाई यांनी केली. अभिजात भाषेचे सर्व निकष मराठीने पूर्ण केले आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने विलंब करू नये असा आग्रह सुभाष देसाई यांनी धरला. तसेच मराठी माणसांनी राष्ट्रपती महोदयांना आजपर्यंत एक लाख वीस हजार पत्रे लिहिली आहेत, अशी आठवणही सुभाष देसाई यांनी अमित शाह यांना करुन दिली. तर सुभाष देसाई यांच्या या मागणीनंतर मी स्वत: यामध्ये लक्ष घालून विषय मार्गी लावण्याचे प्रयत्न करेन असे आश्वासन अमित शाह यांनी देसाई यांना दिले आहे.

या परिषदेस गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत तसेच दिव दमणचे प्रशासक प्रफुल्ल पटेल इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. आतापर्यंत तमिळ, संस्कृत, मल्याळम, तेलुगू, कन्नड आणि ओडिया या सहा भाषांना हा दर्जा मिळाला आहे. ‘रंगनाथ पठारे समिती’ने तयार केलेल्या अहवालात मराठीला अभिजात दर्जा द्यावा, अशी शिफारस करण्यात आली आहे. मात्र याला ७ वर्षे उलटून गेली असून अद्याप मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला नाही.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या